Closing Bell Today | शेअर बाजारात G20 चा प्रभाव! सेन्सेक्स ५२८ अंकांनी वाढला, निफ्टी २० हजारांवर

Closing Bell Today | शेअर बाजारात G20 चा प्रभाव! सेन्सेक्स ५२८ अंकांनी वाढला, निफ्टी २० हजारांवर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी सलग सातव्या दिवशी तेजीत व्यवहार झाला. विशेष म्हणजे आज शेअर बाजारात दिल्लीतील G20 परिषदेचा प्रभाव दिसून आला. सेन्सेक्स आज ५२८ अंकांनी वाढून ६७,१२७ वर बंद झाला. तर निफ्टीने प्रथमच २० हजारांचा टप्पा गाठला. त्यानंतर निफ्टी १७६ अंकांच्या वाढीसह १९,९९६ वर स्थिरावला. ऑगस्टमधील किरकोळ महागाईचा डेटा आणि उद्या जाहीर होणाऱ्या जुलैच्या औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवरही सेन्सेक्स आणि निफ्टी वाढण्यास मदत झाली. आज सर्वच क्षेत्रांत खरेदी दिसून आली.

एनएसईचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टी ५० हा आज मागील बंदच्या तुलनेत जवळपास १ टक्के वाढला. निफ्टी ५० आणि बीएसई सेन्सेक्स गेल्या आठवड्यात प्रत्येकी सुमारे २ टक्क्यांनी वाढले आहेत. देशांतर्गत मजबूत आर्थिक डेटा आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या जोरावर दोन्ही निर्देशांकांच्या वाढीस सपोर्ट मिळाला आहे.

रेल्वे स्टॉक्सची १९ टक्क्यांपर्यंत उसळी

विशेषतः आजच्या ट्रेडिंग सत्रात रेल्वे स्टॉक्सनी १९ टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. याला कारण ठरली G20 शिखर परिषद. गेल्या ६ महिन्यांत आधीच गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या पीएसयू रेल स्टॉक इरकॉन इंटरनॅशनलचे (Ircon International Share Price) शेअर्स आज १९ टक्क्यांपर्यंत वाढून १६० रुपयांवर पोहोचले. तर आयआरएफसीचे शेअर १० टक्क्यांनी वाढून अप्पर सर्किटमध्ये पोहोचले. हा शेअर १० टक्के वाढीसह ८४ रुपयांवर गेला. आरव्हीएनएल (RVNL) ९ टक्के आणि टिटागड वॅगन्स (Titagarh Wagons) चे शेअर्स ५ टक्क्यांनी वाढले. रेलटेल, RITES या शेअर्समध्येही खरेदी दिसून आली.

नवी दिल्लीतील G20 शिखर परिषदेच्या दरम्यान मध्य पूर्व, दक्षिण आशिया आणि युरोपमधील देशांना जोडणारा शिपिंग आणि रेल्वे वाहतूक कॉरिडॉरच्या घोषणा झाली. यामुळे रेल्वे स्टॉक्सना झळाळी मिळाली. नवीन कॉरिडॉरच्या घोषणेमुळे अमेरिका, भारत, सौदी अरेबिया, आखाती आणि अरब देश आणि युरोपियन युनियन यांना जोडणारे सर्वसमावेशक रेल्वे आणि शिपिंग कनेक्टिव्हिटी नेटवर्क निर्माण होणार आहे.

आज सेन्सेक्सवर ॲक्सिस बँक, पॉवर ग्रिड, मारुती, एचसीएल टेक, एसबीआय, टाटा मोटर्स, टाटा स्टील, नेस्ले इंडिया, आयटीसी, टीसीएस, एम अँड एम, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, विप्रो हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर बजाज फायनान्स, एलटी हे शेअर्स किरकोळ‍ घसरले.

व्होडाफोन आयडियाचा शेअर १० टक्क्यांनी वाढला

आज एनएसईवर व्होडाफोन आयडियाचे (Vodafone Idea Share Price) चे शेअर्स १० टक्क्यांनी वाढून १२ रुपयांवर पोहोचले. या कंपनीने मार्च तिमाहीसाठी त्यांचे परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम वापर शुल्क (SUC) देय रकमेचे ५० टक्के पेमेंट केल्यानंतर व्होडाफोन आयडियाचे शेअर्समध्ये तेजी आली.

अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स (Adani Enterprises shares) आज ३ टक्क्यांनी वाढले. सिंगापूरमधील अदानींच्या उपकंपनीने ग्रीन अमोनिया, ग्रीन हायड्रोजन आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ह्जच्या विक्री आणि विपणनासाठी कोवा होल्डिंग एशिया, सिंगापूरसोबत संयुक्त उपक्रम करार केला आहे. त्यानंतर अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स वधारले.

दरम्यान, चीनमधील औद्योगिक उत्पादन, विक्रीच्या चिंतेमुळे आज आशियाई बाजारात घसरण झाली.

एक्सचेंजच्या डेटानुसार, परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी (Foreign institutional investors) शुक्रवारी २२४ कोटींच्या शेअर्सची विक्री केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १,१५० कोटींचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news