फ्रान्‍समध्‍ये हिंसाचाराचा आगडोंब, जाणून घ्‍या नेमकं काय घडलं?

फ्रान्‍समध्‍ये हिंसाचाराचा आगडोंब, जाणून घ्‍या नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : फ्रान्‍समध्‍ये सलग दुसर्‍या दिवशी हिंसाचाराचे सत्र सुरुच राहिले आहे. विविध भागांतून जाळपोळ आणि दगडफेकीच्‍या घटना समोर येत आहेत. ( France protests ) अनेक ठिकाणी जमाव पोलिसांसह सुरक्षा दलांच्‍या जवानांवर हल्‍ले करत आहे. २४ पोलीस जखमी झाले आहेत. अनेक वाहनांना पेटवून दिल्‍याचे व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाल्‍याने अनेक शहरांमधील तणाव वाढला आहे. हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३१ जणांना अटक केली असल्‍याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

France protests :  नेमकं काय घडलं ? कशामुळे उडला हिंसाचाराचा भडका?

मंगळवार २७ जून रोजी फ्रान्‍सची राजधानी पॅरिसच्या उपनगरातील नॅनटेरेमध्ये एका किशोरवयीन तरुणाने वाहतूक नियम मोडला. यावेळी पोलिसांनी त्‍याच्‍यावर गोळ्या झाडल्या. छातीत गोळी लागल्‍याने अल्‍पवयीन मुलगा ठार झाला. मुलाने पोलिसांवर हल्‍ला केल्‍यामुळे गोळीबार करावा लागल्‍याचा दावा पोलिसांनी केला. मात्र या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीसांनी केवळ वाहतूक नियम मोडल्‍यामुळे थेट मुलावर गोळीबार केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. यानंतर संतप्त जमावाने दगडफेक आणि जाळपोळ सुरू केली. अनेक वाहने जाळण्यात आली.

जमावाने वाहने पेटवली, काही तासांत विविध शहरांमध्‍ये हिंसाचाराचे लाेण

नॅनटेरे शहरात रस्‍त्‍यावर उतरलेल्‍या आंदोलकांनी वाहने पटेवून दिली. काही तासांमध्‍ये हिंसाचाराचे लोण देशातील विविध गात पसरले अनेक ठिकाणी बसेस जाळण्यात आल्या. दक्षिण फ्रान्सच्या टुलुझ शहरात जमावाने पोलिसांवर तुफान दगडफेक केली.उत्तरेकडील लिली शहरात आणि नैऋत्येकडील टूलूसमध्ये पोलिसांची निदर्शकांशी चकमक झाली आणि फ्रान्सच्या राजधानीच्या दक्षिणेस एमियन्स, डिजॉन आणि एस्सोन प्रशासकीय विभागातही तणाव निर्माण झाला होता, असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले.

अल्‍पवयीन मुलावर गोळ्या झाडणार्‍या पोलिस अधिकार्‍याची चौकशी करण्‍यात येत आहे. फ्रान्सच्या मानवाधिकार लोकपालाने मृत्यूची चौकशी सुरू केली आहे, 2022 आणि 2023 मध्ये अशाच प्रकारच्या घटनांचा हा सहावा प्रकार आहे. गृह मंत्रालयाने शांततेचे आवाहन केले आहे. पॅरिस शहरातील सुरक्षा व्‍यवस्‍थेत वाढ करण्‍यात आली आहे. हत्‍या झालेल्‍या अल्‍पवयीन मुलाच्‍या आईने नॅनटेरे येथे मोर्चा काढला. प्रत्येकजण या, आपण मुलासाठी बंड करु, असे आवाहन करतानाचा तिचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे.

France protests : गोळीबाराच्‍या घटनेवर राजकारण

पोलीस कर्मचाऱ्याने तरुणाच्या हत्येचा तीव्र निषेध केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. सरकारने आपल्या वक्तव्यात सुरक्षा दलांवरही टीका केली आहे. या प्रकरणी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, अल्‍पवयीन मुलाची हत्या हा अक्षम्य गुन्‍हा आहे. याचे समर्थन कोणीही करु शकत नाही. फ्रान्समधील या घटनेमुळे पोलीस नियमांमध्ये सुधारणा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विशेषत: वांशिक अल्पसंख्यांकांशी व्यवहार करताना पोलिसांच्या वर्तनावर टीका होऊ लागली आहे. गेल्या वर्षी फ्रान्समध्ये पोलिसांच्या कारवाईत १३ जणांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news