पुढारी ऑनलाइन न्यूज : Claim Case : मुलगा आणि सूनेच्या मृत्यूनंतर सासूला १.३१ कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश इंदूरच्या जिल्हा न्यायालयाने दिले आहे. सून श्वेताच्या बाबतीत 82.12 लाख रुपये आणि मुलगा आयुषच्या बाबतीत 49.86 लाख रुपये भरपाई मिळाली आहे. न्यायालयाने सासू मालती हिच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण स्कीम 94 मधील 29 वर्षीय आयुष आणि 28 वर्षीय पत्नी श्वेता दीक्षित यांच्या मृत्यूशी संबंधित आहे. अमर उजालाने याचे वृत्त दिले आहे.
इंदुरमधील आयुष दीक्षित हा व्यवसायासोबत विक्री व्यवस्थापक देखील होता तर श्वेता पंजाब नॅशनल बँकेत व्यवस्थापक होती. आयुष आणि श्वेता दीक्षित यांचे लग्न तीन वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना कोणतीही संतान नव्हती. दोघे 16 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 1.30 वाजता हॉटेलमधून जेवण करून परतत होते. त्यावेळी त्यांची वेगवान कार बॉम्बे हॉस्पिटल चौकाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरमध्ये घुसली होती. यामध्ये दोघांचीही मृत्यू झाला.
अपघातानंतर श्वेताची सासू मालती देवी, सासरे गौरीशंकर दीक्षित (53) आणि दीर दिव्यांश यांनी न्यायालयात क्लेम केस दाखल केला. 25 ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायालयाने व्याजासहित 1.31 कोटी रुपयांचा भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यानच सासऱ्याचे कोरोनामुळे निधन झाले होते, त्यामुळे संपूर्ण रक्कम सासूच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
सून श्वेताच्या बाबतीत 59.48 लाख रुपये भरपाई आणि सहा वर्षांचा व्याज 22.64 लाख रुपये मिळून एकूण 82.12 लाख रुपये मिळाले. यात 19.48 लाख रुपये एफडीच्या रूपात जमा राहतील. तर मुलगा आयुषच्या बाबतीत 36.11 लाख रुपये भरपाई आणि सहा वर्षांचा व्याज 13.74 लाख रुपये मिळून एकूण 49.86 लाख रुपये मिळाले. यात 20 लाख रुपये एफडीच्या रूपात जमा राहतील.
न्यायालयाने सांगितले की जरी सासू ही आपली सून श्वेतावर अवलंबून नव्हती, परंतु हिंदू विवाह अधिनियमानुसार अपघातामुळे ती सूनेच्या सुखापासून वंचित झाली आहे. सासूचे तिच्याकडून प्रेम, स्नेह, मार्गदर्शन, भरण-पोषण सर्व काही सुटून गेले. यामुळे सूनेच्या मृत्यूनंतर तिच्या पैशांची भरपाई देखील तिच्या सासूला दिली पाहिजे. सासऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे न्यायालयाने रक्कम सासू मालती देवीच्या खात्यात जमा करण्याचा आदेश दिला आहे.
हे ही वाचा :