सिनेस्टाईल थरार: राहुमध्ये कोयता, सत्तूर घेऊन युवकांचा पाठलाग; नागरिकांचा हस्तक्षेप

file photo
file photo

राहु (पुणे), पुढारी वृत्तसेवा: जागेच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीचे रूपांतर एकमेकांच्या पाठीमागे कोयते घेऊन जीवघेणा हल्ल्यात झाले. ग्रामस्थांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. हा सिनेस्टाईल थरार राहू (ता. दौंड) येथील मिसळवाडी ते राहू मुख्य चौकाच्या दरम्यान बुधवारी (दि. १९) दुपारी १ च्या दरम्यान घडला. कोयते व सत्तूर घेऊन पळाल्यामुळे गावात बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती. या थरारामुळे गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, राहूनजीक असलेल्या गांधीनगर येथे दुपारच्या सुमारास गायरान जागेच्या वादातून दोन गटात शाब्दिक चकमकीचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. त्यानंतर एकमेकांच्या पाठीमागे कोयते घेऊन ते धावत सुटले होते. त्यातीलच एकाने बचावासाठी एका हॉस्पिटलमध्ये घुसून चाकू दाखवल्याने डॉक्टर तसेच रुग्णांमध्ये घबराट निर्माण झाली होती. या वेळी जवळच असलेल्या काही युवकांनी हातात चाकू घेतलेल्या हल्लेखोराला पकडून ठेवून गावचे पोलिस पाटील सुरेश सोनवणे, तंटामुक्त समितीचे रामभाऊ कुल यांना याबाबत माहिती दिली. पोलिस पाटील आल्यानंतर त्यांनी यवत पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच यवत पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी हल्लेखोरांना घेऊन गेले असून, याबाबत यवत पोलिस ठाण्यात कुठलीही अधिकृत गुन्हा नोंद झाली नसल्याने याबाबत अधिक माहिती उपलब्ध झाली नाही.

राहू गावचा आठवडे बाजार असल्याने भरदिवसा अशी घटना घडल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीदायक वातावरण झाले असून, पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे. दरम्यान, संबंधित दोन्ही कुटुंबे उदरनिर्वाहासाठी राहू येथे राहत असून बाहेरगावच्या नागरिकांमुळे राहू गावची प्रतिमा विनाकारण मलीन होत असल्याची प्रतिक्रिया शांतताप्रिय नागरिकांनी व्यक्त केली. याबाबत तक्रार दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news