पुढारी ऑनलाईन डेस्क : रिअल इस्टेटचा फुटलेला फुगा, बेरोजगारी आणि विकासाची खुंटलेली गती अशा स्थितीत चीनच्या नॅशनल पिपल्स काँग्रेसची वार्षिक बैठक ५ मार्चपासून सुरू होत आहे. ही बैठक ११ मार्चपर्यंत चालेल. नॅशनल पिपल काँग्रेस म्हणजे चीनमधील एक प्रकारची संसद आहे, याची बैठक वर्षातून एकदा होते आणि यात ३ हजार सदस्य भाग घेतात. (China People's Congress)
बीजिंगमधील ग्रेट हॉल ऑफ द पिपल या सभागृहात सर्वसाधारण एक आठवडा ही बैठक चालते. यात कायदे मंजुर केले जातात, आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. त्यानंतर लहान लहान गट बनवून त्यांच्याकडे सरकारची धुरा सोपवली जाते, या लहान गटांच्या बैठका वर्षभर होतात. (China People's Congress)
पण या संसदेला फारसे अधिकार नसतात. बंद दाराआड चीनच्या राष्ट्राध्यक्षकांनी निर्णय घेतलेले असतात, त्याचवर फक्त शिक्का उमटवला जातो. पण या काँग्रेसमधून चीनमधील डाव्या पक्षाची अधिकृत भूमिका समजून येते, त्याचा चीन आणि जगावर कसा परिणाम होईल याचे अंदाज बांधले जातात, त्यामुळे काँग्रेसला महत्त्व असते.
काही दशके चीनमधील अर्थव्यवस्थेची कामगिरी उत्तम राहिली होती, त्यामुळे काँग्रेससमोर फारसा अडचणींचा डोंगर नव्हता. यंदा मात्र ही स्थिती पूर्ण बदलेली आहे. चीनची अर्थव्यवस्था रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदीच्या गर्तेत अडकली आहे. लाखो चिनी लोकांचे पैसे फ्लॅट खरेदीत अडकले आहेत, ज्यांना प्रत्यक्षात कधी फ्लॅट मिळालेलेच नाहीत. दुसरीकडे चीनमध्ये बेरोजगारांची संख्या वाढत आहे, स्थानिक स्वराज्य संस्था कर्जबाजारी होऊ लागल्या आहेत. स्थानिक प्रशासनावरील कर्जाचे ओझे वाढल्याने पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांतही पुरेश गुंतवणूक सरकार करू शकत नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे.
या स्थितीत राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग या संदेश देतात याचे चीन आणि जगाचे लक्ष लागलेले असेल. काँग्रेसची सभा सुरू होण्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांचे भाषण होते, यात सरकारने मागील १२ महिन्यात काय काम केले, याचा अहवाल सादर केला जातो. त्यानंतर पुढील वर्षासाठी पक्षाने काय नियोजन केले आहे, याची मांडणी केली जाते.
हेही वाचा