चीनमध्ये झेपावली पहिली स्वयंचलित फ्लाईंग टॅक्सी! | पुढारी

चीनमध्ये झेपावली पहिली स्वयंचलित फ्लाईंग टॅक्सी!

बीजिंग : चीनमधील गुआंगडाँग प्रांतात जगातील पहिल्यावहिल्या इलेक्ट्रिक स्वयंचलित फ्लाईंग टॅक्सीच्या फ्लाईटची यशस्वी चाचणी घेण्यात आली. इव्हीटॉल या नावाने ओळखल्या जाणार्‍या या प्रवासी टॅक्सीत एकावेळी 5 जण प्रवास करू शकतात. या चाचणीला मिळालेले यश ही मोठ्या हवाई क्रांतीची एक झलकच मानली जाते आहे. शेन्झेन ते झुआई या हवाई मार्गावरील ही चाचणी यशस्वी ठरली. या फ्लाईटने 30 मैलांचे अंतर साधारणपणे 20 मिनिटांत पार केले. एरवी या मार्गावरील कार प्रवासाला साधारणपणे तीन तासांचा कालावधी लागतो.

शेंझेलमधील शेकोयू पोर्टवरून या ऑटो टॅक्सीने टेकऑफ केले आणि अवघ्या 20 मिनिटांत झुआई येथील जियुझू पोर्टवर यशस्वी लँडिंग केले. प्रतितास 200 कि.मी. अंतर कापण्याची या फ्लाईंग टॅक्सीची क्षमता आहे. ऑटोफ्लाईट कंपनीचे अध्यक्ष तियान यू यांनी हवाईं प्रवासातील नव्या क्रांतीची ही एक छोटीशी चुणूक असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली.

शहरी भागातील वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय म्हणून इलेक्ट्रिक फ्लाईंग टॅक्सीचा पर्याय अमलात आला आणि त्याच्या प्रायोगिक चाचणीला उत्तम यश प्राप्त झाले. सुरक्षित, विश्वासार्ह आणि प्रदूषणमुक्त प्रणालीमुळे शहरी भागात ही हवाई क्रांती नवे माईलस्टोन ठरेल, असा विश्वास कंपनीतर्फे करण्यात आला आहे. सध्या अशा 100 टॅक्सीचे बुकिंग झाले आहे.

व्हर्टिकल टेकऑफ व लँडिंग हे या इलेक्ट्रिक फ्लाईंग टॅक्सीचे अनोखे वैशिष्ट्य असून, लघू ते मध्यम टप्यातील अंतर यामुळे सहज कापले जाऊ शकते व वेळेचीही बचत होऊ शकते, असे या चाचणीच्या यशस्वितेनंतर सांगण्यात आले. ऑटो फ्लाईटचे हे नवतंत्रज्ञान जागतिक स्तरावर पोहोचावे, असा या कंपनीचा उद्देश असून, त्यानुसार आता वेगाने पावले उचलली जाणार आहेत.

Back to top button