‘तुम्‍ही आगीशी खेळताय..’ : चीनची थेट अमेरिकेला धमकी

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नुकतेच अमेरिकेने तैवानसाठी लष्‍करी पॅकेज जाहीर केले. तसेच आता तैवानचे उपराष्‍ट्रपती विलियम लाई यांनी अमेरिका दौरा केला आहे. यामुळे चीन बिथरला आहे. तुम्‍ही आगीशी खेळत आहात, अशा शब्‍दांमध्‍ये चीनच्‍या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेला धमकी दिली आहे. (China and Taiwan split )

तैवानमध्‍ये बाह्य हस्तक्षेप खपवून घेणार नाही

आंतरराष्ट्रीय सुरक्षेवरील मॉस्को परिषदेत बोलताना चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू म्हणाले की, 'तैवानचा वापर करून चीनवर नियंत्रण ठेवण्याचा कोणताही प्रयत्न अयशस्वी होईल. तैवानचा मुख्य भूप्रदेश चीनसोबत पुनर्मिलन अपरिहार्य आहे आणि ते टाळता येणार नाही. तैवान हा चीनचा अंतर्गत प्रश्‍न आहे. यामध्‍ये कोणताही बाह्य हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.

 China and Taiwan split : पुतीन यांनीही दिला चीनला पाठिंबा

ली शांगफू यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'तैवानशी आगीशी खेळणे आणि तैवानच्या मदतीने चीनला नियंत्रित करण्याचा कोणताही प्रयत्न निःसंशयपणे अयशस्वी होईल'. दरम्‍यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही चीनला पाठिंबा दिला असून अमेरिकेवर जागतिक संघर्ष भडकवत आहे, असा आराेपही त्‍यांनी केला. अमेरिकेने युक्रेनला मदत केल्याचा आरोपही पुतीन यांनी केला.

तैवान उपराष्‍ट्रपतींच्‍या अमेरिका दौऱ्यामुळे तणाव वाढला

विलियम लाई हे तैवानचे उपराष्‍ट्रपती आहेत. आगामी निवडणुकीत तैवानचे राष्ट्राध्यक्ष होण्याच्या शर्यतीतील ते एक प्रमुख उमेदवार आहेत. विल्यम लाई नुकतेच पॅराग्वेला भेट देऊन पॅराग्वेला जाताना अमेरिकेत मुक्‍काम केला. त्‍यांच्‍या अमेरिका भेटीमुळे चीन भडकला आहे.

China and Taiwan split : चीनने तैवानला दिली होती हवाई हल्‍ल्‍याची धमकी

नुकतेच अमेरिकेने तैवानसाठी लष्‍करी पॅकेज जाहीर केले आहे. यामुळे चीन बिथरला आहे. ५ ऑगस्‍ट रोजी चीनच्‍या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ने आपल्‍या ९६ व्‍या वर्धापनदिनानिमित्त 'झू मेंग' डॉक्युमेंटरी (माहितीपट) प्रदर्शित केली. या माध्‍यमातून तैवानवर मोठा हवाई हल्‍ला करण्‍याची धमकीच दिली होती. मागील काही महिने सातत्‍याने ड्रोन आणि लढाऊ विमाने तैवानमध्ये घुसवत चीनने आगळीक कायम ठेवली आहे. एप्रिल २०२३मध्‍ये चीनने तैवानभोवतीच सैन्‍य सराव करत पुन्‍हा एकदा तैवानमध्‍ये दहशत माजविण्‍याचा प्रयत्‍न केला होता. आता अमेरिकेने तैवानसाठी लष्‍करी मदतीचे पॅकेज जाहीर केल्‍याने चीनने पुन्‍हा एकदा आकांडतांडव करण्‍यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news