पुढारी ऑनलाईन डेस्क
आगामी "जिप्सी" या चित्रपटातून बालकलाकार स्वराली कामथे चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. दोनशे मुलींमधून स्वरालीची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे.
बोलपट क्रिएशन्सच्या सहयोगाने "जिप्सी" या चित्रपटाची निर्मिती होत आहे. यश मनोहर सणस यांच्या यश सणस फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केलीय. शशि चंद्रकांत खंदारे हे चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
जिप्सीतील प्रमुख भूमिकेसाठी सात-आठ वर्षांची बालकलाकार हवी होती. मात्र तिच्याकडे अभिनयाव्यतिरिक्त अन्य कौशल्यं असणंही आवश्यक होतं. त्यानुसार सुरुवातीला दोनशे मुलींची प्रोफाईल पाहण्यात आली. पुण्यात ऑडिशन झाल्यानंतर ऐंशी बाल कलाकारांमधून स्वराची निवड झाली.
या चित्रपटातील भूमिकेला साजेशी असणारी स्वराली कामथेही होती. जेजुरीला राहणारी स्वराली तिसरीत शिकत आहे. स्वराली नृत्यात निपुण आहे. त्याशिवाय ती तायक्वांदो, पार्कओव्हर, जिम्नॅस्टिक्सही शिकते. त्यासाठी ती आईबरोबर रोज जेजुरी ते पुणे प्रवास करते.
जिप्सी या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं होतं. चित्रपटाचं चित्रीकरणही लवकरच सुरू होणार आहे.