अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या दहा जुलैच्या आसपास भाजप व शिवसेनेच्या वतीने 'शासन आपल्या दारी' या योजनेतील लाभार्थ्यांचा मेळावा होणार असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी डॉ. विखे यांनी या योजनेचा आढावा घेतला. अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील तसेच सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार उपस्थित होते. त्यानंतर त्यांंनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्य शासनाचाही 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम चांगला असून, महिनाभरात जनतेला विविध विभागांचे दाखले व प्रमाणपत्रे उपलब्ध झाली आहेत. विविध विभागांच्या माध्यमातून जिल्हाभरातील जवळपास दोन लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे. आगामी लोकसभेसाठी विरोधी पक्षांतील नेत्यांच्या आघाडीसाठी बैठका सुरू आहेत. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की देशाचे नेतृत्व कोण करणार, त्यांचा चेहरा त्यांना मांडावा लागणार आहे. बैठकीत चेहरा ठरत नाही तोपर्यंत जनता विश्वास ठेवणार नाही. यापूर्वीच्या निवडणुकीत ज्यांनी पुढाकार घेतला होता, अशा नेत्यांच्या पक्षाला फक्त 2 ते 3 जागा मिळाल्या, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला.
हेही वाचा