Shiv Sena MLA disqualification verdict | अपात्रतेच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पोस्ट चर्चेत, ‘घराणेशाहीच्या बळावर….’

Shiv Sena MLA disqualification verdict | अपात्रतेच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पोस्ट चर्चेत, ‘घराणेशाहीच्या बळावर….’

पुढारी ऑनलाईन : आमदार पात्र-अपात्रतेच्या लढाईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरशी झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाचा निकाल देताना, शिवसेना पक्ष हा बहुमताच्या आधारावर एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निकाल दिला. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. (Shiv Sena MLA disqualification verdict)

संबंधित बातम्या 

आवाज कुणाचा…शिवसेनेचा…ही ताकद कुणाची…शिवसेनेची…हा विजय कुणाचा…शिवसेनेचा… असा नारा शिंदे यांनी दिला आहे. "विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या प्रकरणात शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही असा दिलेला निकाल आणि दुसरीकडे आमच्याकडे असलेला पक्षच खरी शिवसेना आहे यावर केलेले शिक्कामोर्तब… या निर्णयामुळे आनंदित झालेल्या असंख्य शिवसैनिकांनी काल रात्री परतल्यावर मुंबई विमानतळावर माझे जंगी स्वागत केले. तसेच ढोल ताशांच्या गजरात, भगवे झेंडे फडकावत एकमेकांना पेढे भरवत त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले." असे मुख्यमंत्री शिंदे यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुढे त्यांनी म्हटले आहे की, या अवघड वाटेवरून पुढे जाताना आज झालेला हा विजय माझा एकट्याचा नसून माझ्यावर विश्वास टाकून माझ्या भूमिकेला समर्थन देणाऱ्या हजारो लाखो सर्वसामान्य शिवसैनिकांचा विजय आहे असे मी मानतो. तसेच घराणेशाहीच्या बळावर आपण लोकांवर हवे ते लादू शकतो असा समज असलेल्या लोकांचा गैरसमज देखील या निर्णयाने कायमचा दूर केला आहे.

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीही राहुल नार्वेकर यांनी वैध ठरवत, शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र ठरविले. त्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांच्या आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार निघून गेली आहे. या निकालावर शिवसेना कधीच एकनाथ शिंदे यांची होऊ शकत नाही; षड्यंत्र करून हा निकाल दिला असून, त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते.

शिंदे गटाबरोबरच उद्धव ठाकरे यांचे १४ आमदारही विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरविले आहेत. अध्यक्षांनी शिंदे गटाचे भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून वैध ठरविले असून, उद्धव ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांची नियुक्ती अवैध ठरवली. मात्र, गोगावले यांना 'व्हिप' बजावण्याचा अधिकार ग्राह्य असला, तरी तो बजावताना त्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्याने उद्धव ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्र करण्याची याचिका नार्वेकरांनी फेटाळून लावली. मात्र, कोणताही गट अपात्र नसल्याच्या या निर्णयाने आमदारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला, तरी पक्षांतरबंदी कायद्याचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या ३४ याचिकांवर अध्यक्ष नार्वेकर यांनी सहा भागांत आपला निकाल काल वाचून दाखविला. अपात्रतेवर निर्णय सुनावण्यापूर्वी अध्यक्षांनी बंडाळीच्या काळात शिवसेना कोणाची, याचा निर्वाळा दिला. विधिमंडळातील नोंदी आणि बहुमताच्या आधारे एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी ठरत असल्याचा निकाल त्यांनी दिला. शिवसेना पक्षाची १९९ ची घटना ग्राह्य धरत २०१८ सालची घटना अवैध ठरविली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपदही नार्वेकरांनी आपल्या निकालात अवैध ठरविले. (Shiv Sena MLA disqualification verdict)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news