नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कल्याण पोलिस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सुळे यांना लक्ष्य केले आहे. 'फडणवीसांनी सांगितले का गोळ्या मारायला. यात फडणवीस यांचा काय संबंध आहे?', असा उपरोधिक सवाल करत त्यांनी सुळे यांना टोला लगावला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की, मी काल टिव्हीवर पाहिले. पोलीस ठाण्यात गोळीबार झाला. मला आश्चर्य वाटले. एवढा संताप कशासाठी, याचे कारण कळले नाही. ज्यांना गोळ्या लागल्या त्यांचे प्राण वाचावे, अशी प्रार्थना करतो. नक्की काय घडले हे पोलीस तपासात समोर येईलच. आमदार गणपत गायकवाड यांच्यावर हल्ला झाला होता का ? त्यांनी प्रतिकार म्हणून गोळीबार केला का ? हेही पाहावे लागेल. या प्रकरणात दोन लोकांचे वैयक्तीक भांडण दिसत आहे. अशी वैयक्तीक भांडणे सुरुच असतात. मला सुद्धा एक जण जीवे मारण्याची धमकी देत आहे. आता या प्रकरणात फडणवीस काय करणार ? ते कायद्यानुसार कारवाई करतील. त्यामुळे या प्रकरणात एकाच बाजूवर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. अन्यथा अंतरवली सराटीसारखे होईल. अंतरवलीत पोलिसांवर हल्ला झाला होता. ८० पोलीस जखमी झाले होते. त्यानंतर लाठीमाराचे आदेश दिले गेले. परंतु दुसरीच बाजू समोर आली, असे भुजबळ म्हणाले.
हेही वाचा