पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे (INDvsSL). शनिवारी (दि. १९) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी संघाची घोषणा केली. यादरम्यान रोहित शर्माची भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली. तो भारताचा कसोटीत ३५ कर्णधार असेल. चेतन शर्मा म्हणाले, रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना केएल राहुल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह पुढील कसोटी कर्णधार म्हणून तयार होतील. या तिघांपैकी कोणीही भविष्यात भारताचे नेतृत्व करेल. रोहितचे लक्ष टी २० आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेवर अधिक आहे.' (Rahane-Pujara)
विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यातून आणि श्रीलंकेविरुद्धच्या (INDvsSL)संपूर्ण टी २० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी २० आणि कसोटी मालिकेसाठी शार्दुलला विश्रांती देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभ कुमारचा प्रथमच भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. (Rahane-Pujara)
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. चेतन शर्माने संघाची घोषणा करताना म्हटले की, दोघांनाही श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे. ते रणजी स्पर्धेत खेळत आहेत. भारताचे दोन मोठे खेळाडू रणजीमध्ये खेळत आहेत ही चांगली गोष्ट आहे.'
दक्षिण आफ्रिकेत भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करणारा सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांना अनफिट असल्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी २० आणि कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे. राहुलच्या जागी बुमराह कसोटी आणि टी २० मालिकेत टीम इंडियाचा उपकर्णधार असेल.
गेल्या वर्षी टी २० विश्वचषक स्पर्धेपूर्वी विराट कोहलीने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती. विश्वचषकानंतर रोहित शर्माला टी २० आणि वनडेचे कर्णधार बनवण्यात आले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-२ अशा पराभवानंतर कोहलीने कसोटी कर्णधारपदाचाही राजीनामा दिला होता. आता रोहितला कसोटी संघ्याच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
T20 संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि आवेश खान.
कसोटी संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत यादव (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार.