punjab election : पंजाबमध्ये चन्नी ठरताहेत काँग्रेसचे ‘ब्रँड’

punjab election : पंजाबमध्ये चन्नी ठरताहेत काँग्रेसचे ‘ब्रँड’

पंजाब विधानसभा निवडणुकीत ( punjab election ) काँग्रेसचा प्रचार विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळाच्या अवतीभवती एकवटला आहे. पक्षाच्या प्रचार अभियानात त्यामुळे चन्नी 'वन मॅन शो' ठरत आहेत. असे असले, तरी पक्षातील दिग्गज त्यांना खुल्या मनाने मुख्यमंत्री पदाचे उमेदवार स्वरूपात स्वीकारत नाहीत; मात्र संयमी राजकारणी असलेले चन्नी 'सर्वसामान्य' इमेजचा पुरेपूर वापर करीत हळूहळू पावले टाकून 'भ्रमाचा भोपळा' तोडत एक नवीन राजकीय रेष ओढताना दिसून येत आहेत.

निवडणुकीत ( punjab election ) चन्नी एक ब्रँड म्हणून उदयाला आले आहेत. सर्वसामान्य मतदारांमधील चन्नी यांचा वावर निवडणुकीची समीकरणे बदलू शकतो. राज्यात 'व्हीआयपी कल्चर' आहे. शिवाय 'शो ऑफ'ची पद्धत रूढ आहे. लांबलचक महागड्या डिलक्स गाड्या प्रचारात फिरवल्या जातात. सरकारी सुरक्षेचाही गाजावाजा केला जातो. मुख्यमंत्र्यांकडे कडेकोट सुरक्षेचे वलय पूर्वीपासूनच असते. परंतु, चन्नी या 'माहौल'चे वलय तोडताना दिसून येत आहेत. ते सातत्याने सर्वसामान्यांमध्ये दिसून येतात. कधी गावातील 'चावडी'वर वृद्धांसोबत पत्ते खेळताना, तर कधी रात्री जीटी रोडवरील रस्त्याशेजारी असलेल्या सामान्य ढाब्यावर जेवताना.

हावभाव तसेच संवाद कौशल्याने सर्वसामान्यांसोबत संवाद साधताना आपल्यातील एक अशी भावनिक जवळीक निर्माण करण्यात चन्नी यशस्वी ठरतात. सर्वसामान्यांसोबत उठण्या-बसण्यासह जेवण करण्यात त्यांना कुठलाही संकोच नसल्याचा अप्रत्यक्ष संदेश ते देतात. सर्वसामान्यांमधील मुख्यमंत्री झाल्याचा 'फिल' देण्यात तूर्त तरी ते यशस्वी ठरले आहेत. मुख्यमंत्री आणि सर्वसामान्यांत कुठलेही अंतर नाही. आपण कुठल्याही राजघराण्यातून नाही, असा थेट संदेश आपल्या वागण्यातून चन्नी सातत्याने देतात. ( punjab election )

2021 मध्ये पंजाबमधील तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या विरोधात काँग्रेस नेत्यांनी मोर्चा उघडला. कॅप्टन त्यांचा राजेशाही थाट सोडत नसल्याचा आरोप करण्यात आला. ते कुणाशी भेटत नाहीत. शिवाय पक्षाचे आमदार तसेच मंत्र्यांनादेखील त्यांच्या भेटीसाठी ताटकळत राहावे लागते. कॅप्टन यांचे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यामागे हे एक मोठे कारण होते. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून चन्नी यांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी पंजाबचे लोक तसेच प्रमुखांकडून काँग्रेस नेत्यांशी सल्लामसलत झाली होती. तद्नंतरच 6 फेब्रुवारीला राहुल गांधी यांच्या लुधियानातील रॅलीत चन्नी यांच्या नावावर मोहोर उमटवण्यात आली. गरिबांचा आवाज, दु:ख समजणारा, गरिबी दूर करण्यासाठी 'ग्राऊंड लेव्हल'वर काम करणारा आणि ज्याला बघून 'हाच आपला मुख्यमंत्री' अशी भावना 'कॉमन मॅन'च्या आतून येईल, असा फीडबॅक पंजाबच्या लोकांकडून देण्यात आला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यासपीठावरून केलेले हे वक्तव्य ग्राऊंड लेव्हलवर चन्नी त्यांच्या कृतीतून उतरवत आहेत.

राज्यात 32 टक्के दलित मतदारांसह इतर जातींमध्येही चन्नी विशेष लोकप्रिय आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये मुख्यमंत्री पदावरून कॅप्टन यांना हटवून चन्नी यांना संधी दिली तेव्हा राजकीय वर्तुळात त्यांना म्हणावे तेवढे महत्त्व देण्यात आले नव्हते. चन्नी केवळ चेहरा आहेत. पडद्यामागील राजकारण सिंडिकेटच्या माध्यमातून केले जाईल आणि याचे सूत्रधार पंजाब प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या हाती असेल, असे बोलले जात होते.

परंतु, चन्नी यांनी सर्व धारणांना मोडीत काढत शासन आणि प्रशासनात एक घट्ट पकड बनवली आणि मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्व दिग्गजांना मात देत पुढे आले. चन्नी एक 'ब्रँड' बनून उदयाला आले. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात चन्नी यांना काँग्रेसतर्फे स्टार प्रचारक बनवले आहे. पक्षाकडून चन्नी यांच्या लोकप्रियतेचा उपयोग या राज्यातील निवडणुकीत करण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसमध्ये चन्नी यांचे प्रस्थ वाढत आहे.

इतर नेत्यांकडे समृद्ध पार्श्वभूमी

पंजाबमधील अनेक बडे नेत्यांचे एक समृद्ध कौटुंबिक 'बॅकग्राऊंड' आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह पटियाला राजघराण्याचे वारसदार आहेत. माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल एक समृद्ध शेतकरी कुटुंबातून येतात. जवळपास सर्वच बड्या नेत्यांचा समृद्ध-सधन असा कौटुंबिक वारसा आहे. परंतु, चन्नी यांच्यासंदर्भात असे नाही.

  • पंकज कुमार मिश्रा,
    चंदीगड

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news