Chandrayaan-3 | ‘इस्रो’ने शेअर केली विक्रम लँडरने टिपलेली चंद्राची छायाचित्रे

Chandrayaan-3 | ‘इस्रो’ने शेअर केली विक्रम लँडरने टिपलेली चंद्राची छायाचित्रे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : चांद्रयान-३ चे प्रॉपल्शन मॉड्यूल लँडर आणि रोव्हरपासून काल गुरुवारी (दि.१७) वेगळे झाले होते. दरम्यान, १५ आणि १७ ऑगस्ट रोजी विक्रम लँडर मॉड्यूलद्वारे टिपलेली चंद्राच्या जवळची छात्राचित्रे 'इस्रो'ने आज शुक्रवारी ट्विटरवरुन शेअर केली आहेत.

लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेर्‍याने चंद्राची अगदी जवळची आकर्षक छायाचित्रे टिपली असल्याचे 'इस्रो'कडून सांगण्यात आले आहे. लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेऱ्याने (LPDC) ने १५ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राची छायाचित्रे टिपली आहे. तसेच १७ ऑगस्ट २०२३ रोजी प्रोपल्शन मॉड्यूलपासून लँडर मॉड्यूल वेगळे झाल्यानंतर लँडर इमेजर (LI) कॅमेरा-१ ने टिपलेली चंद्राची दृश्ये 'इस्रो'ने शेअर केली आहेत.

दरम्यान, चांद्रयान-३ ने आज शुक्रवारी चंद्राच्या अगदी जवळ जाण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. चांद्रयान-३ चे विक्रम लँडर एक दिवस अगोदर प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे झाल्यानंतर शुक्रवारी त्याला डिबूस्ट करण्यात आले. "लँडर मॉड्यूल (LM) सुस्थितीत आहे. लँडर मॉड्यूल (LM) ने यशस्वीरित्या डीबूस्टिंग ऑपरेशन केले ज्यामुळे त्याची कक्षा ११३ किमी x १५७ किमी पर्यंत कमी झाली आहे. दुसरे डीबूस्टिंग ऑपरेशन २० ऑगस्ट २०२३ रोजी सुमारे २ वाजता होईल," अशी माहिती 'इस्रो'ने दिली आहे.

चांद्रयान-३ ने काल गुरुवारी महत्त्वपूर्ण टप्पा पार केला होता. प्रॉपल्शन मॉड्यूल लँडर आणि रोव्हरपासून वेगळे झाले होते. प्रॉपल्शन मॉड्यूल तीन ते सहा महिने चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणार्‍या रेडिएशनचा अभ्यास करणार आहे. लँडर-रोव्हर येत्या २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. तिथे ते १४ दिवस पाण्याचा शोध घेईल व इतरही प्रयोग करेल.

प्रॉपल्शन मॉड्यूलपासून विभक्त झाल्यानंतर लँडरला डिबूस्ट केले गेले. म्हणजेच त्याचा वेग कमी केला गेला. चंद्राचे किमान अंतर ३० कि.मी. असेल, तेव्हाच २३ ऑगस्ट रोजी सॉफ्ट लँडिंग केले जाईल. चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत असताना एकाक्षणी लँडर-रोव्हरला चंद्राच्या दिशेने ९० अंशात वळावे लागेल. नंतर चंद्राच्या पृष्ठभागाकडे ते उतरू लागतील. या प्रक्रियेत सुरुवातीला त्यांचा वेग जवळपास सेकंदाला १.६८ कि.मी. असेल. थ्रस्टरच्या मदतीने तो कमी करत नेत चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर-रोव्हर सुरक्षितरीत्या उतरविले जाणार आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news