चंद्रपूर : जादूटोणा केल्याच्या संशयावरून विधवा महिलेस मारहाण

चंद्रपूर : जादूटोणा केल्याच्या संशयावरून विधवा महिलेस मारहाण

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : एकाचवेळी कुटूंबातील सर्वांची प्रकृती बिघडल्याने जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका विधवा महिलेस मारहाण केल्याची घटना घडली. या आरोपींना चिमूर पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यान्वये कारवाई करून अटक केली आहे. न्यायालयाने आरोपी देवानंद ऊर्फ देवराव भैय्याजी मेश्राम, भैय्याजी निंबाजी मेश्राम यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. ही घटना काल शुक्रवारी (१२ ऑगस्ट रोजी) चिमूर तालुक्यातील वाघेडा गावात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ४५ वर्षीय विधवा महिला महादवाडी येथील रहिवासी आहे. तिची शेती वाघेडा शेतशिवारात असल्याने ती महादवाडीवरुन वडसी मार्गे वाघेडा येथे पायी शेतावर जात असते. या महिलेच्या शेताला लागूनच वाघेडा येथील आरोपी देवानंद ऊर्फ देवराव भैय्याजी मेश्राम (वय २७) व भैय्याजी निंबाजी मेश्राम (वय ६०) यांची शेती आहे. वर्षभरापूर्वी अरोपी भैय्याजी मेश्राम यांच्या पत्नीची प्रकृती अचानक खराब झाल्यामुळे त्यांनी बऱ्याच खासगी दवाखान्यात उपचार करवून घेतला. परंतु प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. त्याने बुवाबाजीच्या धार्मिक विधीद्वारे माहिती घेतल्यानंतर फिर्यादी विधवा महिलेने जादुटोणा केल्याने त्याच्या पत्नीची प्रकृती बिघडल्याची माहिती त्याला मिळाली. त्यांनतर ६ ऑगस्ट २०२२ ला भैय्याजी निंबाजी मेश्राम याच्या कुटुंबातील सर्वांची एकाचवेळी प्रकृती बिघडली. त्यामुळे फिर्यादी विधवा महिलेनेच जादूटोणा केल्याने सर्वांची प्रकृती बिघडल्याचा संशय बळावला होता.

काल गुरूवारी (११ ऑगस्ट) फिर्यादी विधवा महिला ही नेहमीप्रमाणे वाघेडा येथील शेतावर जाण्यास निघाली. दुपारी बाराच्या सुमारास ती पायी वाघेडा येथे पोहोचली. वाघेडा येथे आरोपींच्या घरासमोरील रस्त्याने ती शेताकडे जात असताना आरोपी देवानंद मेश्राम याने, तिच्या अंगावर धावून जात माझ्या घरच्या कुटुंबियांना जादुटोणा केल्याचा आरोप करीत तिचा विनयभंग केला. तसेच तिला मारपीट केली आणि नालीमध्ये ढकलून दिले. त्यानंतर आरोपी भैय्याजी मेश्राम याने जमिनीत गाढण्याची भाषा वापरून जिवे मारण्याची धमकी दिली आणि मारहाण केली. फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून व उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या वैद्यकीय तक्रारीवरून चिमूर पोलीस ठाण्यात भांदवी कलम ३५४ (अ)(१)(दोन), ३२३, ५०६, ३४, सहकलम ३(२) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध व समुळ उच्चाटन अधिनियम सन २०१३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी दोन्ही आरोपींना अटक करुन दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर केले असता आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पो.उपनिरीक्षक अलिम शेख, पोलीस नाईक कैलास आलाम करीत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news