बारामती विभागाचा केंद्रिय जीएसटी अधीक्षक लाच घेताना जाळ्यात

बारामती विभागाचा केंद्रिय जीएसटी अधीक्षक लाच घेताना जाळ्यात

पुणे : पुढारी वृत्‍तसेवा

कंपनीचा अहवाल सकारात्‍मक देण्यासाठी कंपनी मालकाकडून पाच हजारांची लाच स्विकारणाऱ्या बारामती येथील केंद्रिय जीएसटी विभागाच्‍या अधीक्षकाला केद्रिय गुन्‍हे अन्वेषण विभागाच्‍या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले. त्‍याला 22 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश सीबीआयचे विशेष न्यायाधीश गिरीष भालचंद्र यांनी दिला आहे.

कुलदीप शर्मा असे अटक करण्यात आलेल्‍या केद्रिय जीएसटी विभागाच्‍या अधीक्षकाचे नाव आहे. याबाबत कंपनीच्‍या मालकाने सीबीआयच्‍या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांच्‍या बारामती येथे दोन कंपन्या आहेत. त्‍या कंपनीच्‍या कागदपत्रांची पडताळणी कुलदीप शर्मा करत होता. त्‍या कादपत्रांची पडताळणी केल्‍यानंतर सेवा करासाठी सकारात्‍मक अहवाल पाठविण्यासाठी शर्मा हा तक्रारदारांकडे 5 हजारांच्या लाचेची मागणी करत होता. परंतु, तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्‍याने त्‍याने सीबीआयच्‍या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. त्‍यानंतर सीबीआयने पडताळणी करून मंगळवारी सापळा रचला. शर्मा याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

त्‍याला ताब्यात घेतल्‍यानंतर त्‍याच्‍या बारामती येथील अंबीकानगर मधील श्री हाईट्स येथील घरातून सीबीआयने महत्‍वपूर्ण कागदपत्रे जप्‍त केली आहेत. याप्रकरणात त्‍याला पुण्यातील सीबीआयच्‍या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी शर्माकडे त्‍याच्‍या गुन्‍ह्याच्या पध्दतीबाबत चौकशी करायची असल्‍याने व त्‍याच्‍या आवाजाचे नमुने तपासण्यासाठी त्‍याला तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्याची मागणी सीबीआयच्‍या तपास अधिकारी पोलिस निरीक्षक शितल शेंडगे यांनी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्‍तीवाद ग्राह्य धरून शर्माला पोलिस कोठडी सुनावली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news