Onion news :महाराष्ट्रातील २ लाख मेट्रिक टन कांदा केंद्र खरेदी करणार: पियूष गोयल यांची घोषणा

Onion news :महाराष्ट्रातील २ लाख मेट्रिक टन कांदा केंद्र खरेदी करणार: पियूष गोयल यांची घोषणा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नाफेड व एनसीसीएफ मार्फत राज्यातील २ लाख मेट्रिक टन कांदा २ हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल या दराने आजपासूनच खरेदी केली जाईल, अशी दिलासादायक घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी मंगळवारी (दि.२२) केली. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तडकाफडकी दिल्ली गाठत पियूष गोयल यांची भेट घेत चर्चा केली. यासोबतच जपान दौऱ्यावर असलेले देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गोयल यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती ट्विटरवरून दिली. उभय मंत्र्यांकडून करण्यात आलेल्या मागणीला केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे चित्र आता बघायला मिळाले आहे. (Onion news)

महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, लासलगाव आदी केंद्रांवरून हा कांदा खरेदी करण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास २ लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक कांदा देखील खरेदी केला जाईल. कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावल्यानंतर कांद्याचे भाव पडण्याच्या भीतीने राज्यात पेटलेल्या कांदा प्रश्नावर मुंडे यांची भेट महत्वाची ठरली.

केंद्रीय मंत्री गोयल यांच्याशी चर्चा करीत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही गोयल यांना फोन आले. त्यांनी देखील राज्यातील कांदा नाफेड व एनसीसीएफ मार्फत खरेदी केला जावा, याबाबत आग्रही विनंती केल्याची माहिती मुंडेंनी दिली.

दरम्यान, केंद्र व राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यापूर्वी देखील नाफेड व एनसीसीएफ मार्फत राज्यातील ३ लाख मेट्रिक टन कांदा केंद्र सरकारने खरेदी केलेला आहे. त्याचबरोबर आता आणखी २ लाख मेट्रिक टन कांदा २, ४१० प्रतिक्विंटल भावाने खरेदी करण्यात येत असून कांद्याचे भाव उत्पादक व खरेदीदार या दोघांच्या दृष्टीने संतुलित राहतील, यासाठी सरकार प्रयत्नशील राहील. तसेच कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, असे गोयल यांनी स्पष्ट केले.

Onion news : केंद्राने निर्यात शुल्काबाबत पुनर्विचार करावा – मुंडे

केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चेनंतर त्यांनी तत्काळ राज्यातील कांदा खरेदी करण्याबाबत घोषणा केली, तसेच २,४१० रुपये प्रति क्विंटलचा भाव देऊन कांदा खरेदीस तत्काळ सुरुवात देखील केली. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दूरध्वनीवरून सातत्याने माझ्या व गोयल साहेबांच्या संपर्कात होते. तसेच कांदा खरेदीबाबत आग्रही होते. केंद्र सरकारने निर्यात शुल्काबाबत पुनर्विचार करावा, अशी विनंती देखील आम्ही केली आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांसोबत बोलताना मुंडे यांनी दिली.

कृषीमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांसह सर्वांचे आभार

दरम्यानच्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, या दृष्टीने तत्काळ खरेदीचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर मुंडे यांनी दिली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news