Onion news : आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ पडली ओस | पुढारी

Onion news : आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ पडली ओस

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

केंद्राने लादलेल्या 40 टक्के निधी शुल्कासंदर्भात नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह बाजार समित्यांनी जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जात नाही, तोपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकट्या लासलगाव बाजार समितीचे फक्त कांद्याचे पाच कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये सोमवार (दि. 21) पासून बेमुदत बंद पुकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी लासलगाव बाजार समितीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. Onion news

यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष भारत दिघोळें तसेच केदारनाथ नवले व विजय भोरकडे यांच्यासह सचिव नरेंद्र वाढवणे उपस्थित होते. Onion news

दरम्यान आशिया खंडातील मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असता, मुंडे यांनी मंगळवारी (दि. 22) जिल्हाधिकारी कार्यालयात बाजार समिती सभापतींची तातडीची बैठक आयोजित केल्याचे समजते. मुंडे यांनी तत्काळ केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी यासंदर्भात चर्चा केल्याचे समजते. या प्रश्नी तत्काळ लक्ष घालून सोडवण्यासंदर्भात विनंती केली आहे. Onion news

लासलगाव बंद बाजार समिती बंदच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नाशिक ग्रामीण पोलिसच्या अधीक्षक माधुरी कांगणे केदार तसेच निफाडचे पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश पालवे, लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा :

Back to top button