PSI Vikas Shelke | पिंपरी-चिंचवड : ड्रग्ज विक्रीतून कोट्यधीश होण्याचा मोह फौजदाराच्या अंगलट

विकास शेळके, पोलीस उपनिरीक्षक
विकास शेळके, पोलीस उपनिरीक्षक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : झटपट कोट्याधीश होण्याचा मोह पिंपरी- चिंचवड पोलिस दलातील एका फौजदाराच्या अंगलट आला आहे. नाकाबंदीत मिळालेले ड्रग्ज विक्री करताना फौजदार जाळ्यात अडकला आहे. त्याच्याकडून सुमारे ४५ कोटी रुपयांचे ४५ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलासह राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. PSI Vikas Shelke

विकास शेळके (नेमणूक- निगडी पोलिस ठाणे), असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. नमामी शंकर झा ( वय ३२, रा. निगडी, मूळ रा. बिहार) याला सुरुवातीला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी पोलीस अंमलदार विजय मोरे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. PSI Vikas Shelke

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकजण विशालनगर परिसरात मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्यातील अंमलदार विवेक गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर सांगवी पोलिसांनी सापळा रचून नमामी शंकर झा याला दोन किलो मेफेड्रोनसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत उपनिरीक्षक विकास शेळके यांनी हे ड्रग्स त्याच्याकडे दिल्याचे समोर आले. त्यांच्याकडून एकूण ४५ कोटी रुपये किंमत असलेले ४५ किलो मेफेड्रोन आतापर्यंत जप्त करण्यात आले आहे.

PSI Vikas Shelke  रस्त्यावर पडले होते ४५ कोटींचे मेफेड्रोन

मागील महिन्यात २६ फेब्रुवारीरोजी रात्री एका गाडीतून मेफेड्रोन असलेले पोते रस्त्यावर पडले. त्यावेळी कारचालक ईश्वर मोटे यांनी ते पोते रस्त्यावरून बाजूला घेतले. मोटे यांनी पोते उघडून पाहिले असता आत काळसर रंगाचा पदार्थ असलेले त्यांना दिसून आले. कोणत्यातरी कंपनीचा कच्चामाल असल्याचा त्यांचा समज झाला. त्यांनी नाकाबंदीतील पोलिस अंमलदार सुधीर ढवळे आणि अनिल चव्हाण यांच्याकडे पोते दिले. यातील ढवळे हा आरोपी उपनिरीक्षक शेळके याचा रायटर होता. त्याने याबाबत शेळके याला माहिती दिली. शेळकेने पोते लपवून ठेवण्याचा सल्ला देत याबाबत वाच्यता न करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, ढवळे आणि चव्हाण यांनी पोते लपवून ठेवले.

PSI Vikas Shelke मेफेड्रोन पाहून फिरले डोळे

पंचेचाळीस कोटी रूपये किंमत असलेले मेफेड्रोन पाहून आरोपी विकास शेळके याचे डोळे फिरले. मेफेड्रोन विक्रीतून आपण कोट्याधीश होऊ, असे स्वप्न त्याने रंगवले. मेफेड्रोन विक्री करण्याचा प्लॅन त्याने रचला. रावेत परिसरातील एका नामचीन गुन्हेगाराकडे आरोपी नमामी झा याला पाठवले. मात्र, नामचीन गुन्हेगाराने सांगवी येथील एका पोलीस कर्मचाऱ्याला याबाबत टीप दिली. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या कानावर ही बाब घातली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार सापळा रचून नमामी झा याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने विकास शेळके याचे नाव समोर आणले. त्यानुसार शेळकेला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या ताब्यातील मेफेड्रोन जप्त केले आहे.

कारचालक अनभिज्ञ

आरोपी शेळके याच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी कारचालक ईश्वर मोटे यांना छत्रपती संभाजीनगर येथील त्याच्या मूळ गावातून ताब्यात घेतले. मोटे यांनी पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. त्यानुसार, पोलिसांनी माहितीची पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य आढळून आले. याबाबतचे काही सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना मिळाले आहेत. त्यामुळे मोटे यांची काहीही चूक नसल्याचे सांगितले जात आहे.

कोण आहे नमामी शंकर झा

आरोपी विकास शेळके याची झटपट श्रीमंत होण्यासाठी धडपड सुरू होती. त्यासाठी नोकरी करण्यासोबतच तो एका हॉटेलमध्ये पार्टनर देखील झाला होता. या प्रकरणात सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या नमामी शंकर झा त्याच्या हॉटेलमध्ये कामाला होता. शेळके याच्या या पार्टनरशिप बाबत पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news