नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपालपदावरून कार्यमुक्त करण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांच्या जागी कॅप्टन अमरिंदर सिंग यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंजाब निवडणुकीपूर्वी अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी आपला पक्ष पंजाब लोक काँग्रेस हा भाजपमध्ये विलीन केला आहे.
विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई दौऱ्यावर पंतप्रधान मोदी आले होते. त्यावेळी राज्यपाल पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. कोश्यारी यांची 2019 मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. या पदावरील त्यांची आतापर्यंतची कारर्किद वादग्रस्त ठरली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्राचा अपमान आणि इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. (Amarinder Singh)
29 जानेवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पंजाबमधील पटियाला येथे रॅली होणार होती. या रॅलीत कॅप्टन अमरिंदर सिंग देखील सहभागी होणार होते. रॅलीची पूर्ण तयारी करण्यात आली होती. या रॅलीद्वारे कॅप्टन पंजाबमध्ये शक्तीप्रदर्शन करणार होते. मात्र, आता या रॅलीला मुदतवाढ दिल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती कऱण्यात येणार असल्य़ाच्या चर्चांना जोर आला आहे.
यापूर्वी उपराष्ट्रपतीपदासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नावही चर्चेत आले होते. मात्र, नंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल असलेले जगदीप धनखर यांना भाजपने या पदासाठी उमेदवारी दिली. त्यावेळी कॅप्टन परदेशात उपचार घेत होते. याआधी काँग्रेस पक्षापासून फारकत घेतल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेस या नावाने स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. 2022 च्या पंजाब विधानसभेची निवडणूक त्यांनी भाजपसोबत युती करून लढवली होती. मात्र, त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.
हेही वाचलंत का ?