राज्यपाल भवनाचे झाले भाजप भवन; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका | पुढारी

राज्यपाल भवनाचे झाले भाजप भवन; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. खरेतर त्यांचा संबंध राष्ट्रपती यांच्याशी असतो. पण, त्यांच्या काळात राज्यपाल भवनाचे भाजप भवन झाले होते, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. राज्यपालांची हकालपट्टी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. पटोले समताभूमीमध्ये पत्रकारांशी सोमवारी बोलत होते. ते म्हणाले की, राज्यपालांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते. महाराष्ट्रातील महापुरुषांचा राज्यपालांनी सतत अवमान केला. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्याविरोधात आंदोलन केले होते तसेच त्यांच्या हकालपट्टीची मागणी राष्ट्रपतींकडे केली होती.

शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी युती केल्यासंदर्भात विचारणा केली असता पटोले म्हणाले की, ठाकरे यांचा सकाळी फोन आला होता. त्यांनी ही माहिती दिली. आंबेडकर यांचा प्रस्ताव सांगण्यास आम्ही ठाकरे यांना कळविले आहे. तो प्रस्ताव मिळालेला नाही. त्यापूर्वी प्रतिक्रिया देणे चुकीचे आहे. त्यांच्या आघाडीला शुभेच्छा आहेत.

कसबा पेठ पोटनिवडणुकीबाबत पक्षाकडे नऊ-दहा इच्छुक आहेत. तीन-चार फेब्रुवारीपर्यंत आम्ही उमेदवार जाहीर करू, असे पटोले यांनी सांगितले. बिनविरोध निवडणुकीसंदर्भात भाजपचा प्रस्ताव आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एखादा सदस्य दगावल्यास त्यांच्या कुटुंबीयांना बिनविरोध निवडून देण्याची महाराष्ट्राची परंपरा काँग्रेसने सुरू केली. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आम्ही उमेदवार दिला नव्हता. पंढरपूर, देगलूर, कोल्हापूर येथे मात्र विरोध झाला होता.

Back to top button