महाराष्ट्र आरोग्य विभागाचा आगीतून फुफाट्यात ‘गोंधळग्रस्त’ कारभार संपेना; परीक्षार्थींना मरणयातना

महाराष्ट्र आरोग्य विभागाचा आगीतून फुफाट्यात ‘गोंधळग्रस्त’ कारभार संपेना; परीक्षार्थींना मरणयातना

'मी मूळचा फलटण तालुक्यातील असून, सध्या पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. आरोग्य विभागाच्या येत्या 24 ऑक्टोबरच्या गट 'क'च्या परीक्षेसाठी मी फॉर्म भरला आणि परीक्षा केंद्र पुणे निवडले. पण, मला कोल्हापूरचे केंद्र देण्यात आल्याचे प्रवेशपत्रात पाहायला मिळाले. पेपर सकाळचा असून मी कधी पोहोचणार हा प्रश्न आहे. हेल्पलाईनवर कॉल केल्यास समस्यांची व्हॉईस रेकॉर्ड करायला सांगतात आणि परत कॉल येईल, असे सांगितले जाते. अद्याप कोणताही कॉल आला नाही,' या पदासाठी फॉर्म भरलेले उमेदवार ऋषीकेश भिसे सांगत होते. (आरोग्य विभाग भरती परीक्षा)

आरोग्य विभागाच्या भरतीचे काम न्यासा कंपनीला दिलेले आहे. या कंपनीच्या गोंधळामुळे दोन वेळा आरोग्य खात्याने परीक्षा पुढे ढकलली. गेल्या वेळी तर आयत्या वेळीच परीक्षा पुढे ढकलली. तरीही कंपनीला तब्बल एक महिना देण्यात आला; मात्र कंपनीचा सावळा गोंधळ अद्याप संपलेला दिसत नाही. गट 'क'ची परीक्षा 24 ऑक्टोबर, तर गट 'ड'ची परीक्षा 31 ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे. त्यापैकी 24 ऑक्टोबरचे प्रवेशपत्र उमेदवारांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, यामध्ये सेंटर बदलल्याने उमेदवार बुचकळ्यात पडले

सकाळच्या सत्रात 'टेक्निकल' तर दुपारच्या सत्राता 'क्लिरिकल' परीक्षा

येत्या 24 ऑक्टोबरला सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत तीन परीक्षा होणार असून, काही उमेदवारांनी तीन वेळा फॉर्म भरले. त्यासाठी फीदेखील तीन वेळा भरली आणि तीनही परीक्षेसाठी जवळचे सेंटर निवडले. सकाळच्या सत्रात 'टेक्निकल' तर दुपारच्या सत्राता 'क्लिरिकल' परीक्षा होणार आहेत. परंतु उमेदवारांना तीनही सेंटर वेगवेगळ्या जिल्ह्यांत दिल्याने त्यांना एकच परीक्षा देता येणार आहे. तीदेखील फॉर्म भरताना निवडलेले केंद्र न देता भलत्याच जिल्ह्यात दिल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत.

पुण्यातील एका उमेदवाराने परीक्षा फॉर्म भरताना पुण्यातील सेंटर निवडले होते. मात्र, त्याला अमरावतीचे सेंटर दिल्याचे कळले. दुसर्‍या एका उमेदवाराने पुणे सेंटर निवडले असता त्याला कोल्हापूर सेंटर मिळाले आहे.

आरोग्य विभागाच्या भरतीत पुन्हा गोंधळ

राज्याच्या आरोग्य विभागातील गट क आणि गट ड संवर्गातील पदांच्या भरती प्रक्रियेतील गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. या परीक्षा 24 आणि 31 ऑक्टोबरला होणार असताना एकाच उमेदवारांना दोन जिल्ह्यांत एकाच वेळी परीक्षा केंद्र देण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला आहे.

गट क संवर्गातील 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी राज्यातील 1500 केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे.

गट क आणि गट डच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संवर्गासाठी अर्ज भरले आहेत. मात्र सगळ्या संवर्गाची परीक्षा एकाच दिवशी आयोजित केल्याने दोन परीक्षांचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. यात विद्यार्थ्यांना जिल्हा बदलून परीक्षा केंद्र मिळाल्याचेही समोर आले आहे. याशिवाय अन्य तांत्रिक तक्रारींचाही भडिमार सुरू आहे.

परीक्षेचे नियोजन करणार्‍या न्यासा कंपनीच्या अशाच कारभारामुळे यापूर्वी परीक्षा रद्द करण्याची वेळ आली होती. हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी कानाकोपर्‍यातून परीक्षा केंद्रांबाहेर हजर झाले असताना अचानक परीक्षा रद्द करण्यात आली. परिणामी, विरोधकांच्या टीकेचाही सामनाही राज्य सरकारला करावा लागला आणि नव्या तारखा जाहीर कराव्या लागल्या.

हे ही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news