मंत्रिमंडळ विस्तार : पुण्याला संधी मिळणार की पुन्हा डावलणार !

मंत्रिमंडळ विस्तार : पुण्याला संधी मिळणार की पुन्हा डावलणार !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शारदीय नवरात्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. यात शहर आणि जिल्ह्यातील आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार की पुन्हा डावलले जाणार? याकडे लक्ष लागले आहे. प्रामुख्याने भाजपमधून चार आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक असून, यामधील किमान एकाची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. या कालावधीत केवळ तीन महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ जणांना मंत्रिपदाची संधी मिळाली. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक आमदार मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. या सरकारमधील पालकमंत्रिपदाचे वाटप झाल्यानंतर विजयादशमीपूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या :

त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील आमदारांना या मंत्रिमंडळात संधी मिळणार का? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. प्रामुख्याने पुणे शहरातून पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे, दौंडचे आमदार राहुल कुल आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची नावे चर्चेत आहे. भाजपमध्ये एकही महिला मंत्री नसल्याने सलग तीन टर्म आमदार असलेल्या मिसाळ यांना संधी मिळू शकते. मातंग समाजालाही या मंत्रिमंडळात अद्याप प्रतिनिधित्व नसल्याचे कांबळे यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो. जिल्ह्यातून भाजपचे एकमेव आमदार असल्याने कुल यांचेही नाव पुढे येऊ शकते. आगामी पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पिंपरी-चिंचवड शहरातून लांडगे यांचेही नाव स्पर्धेत येऊ शकते. एकंदरीत, तीन पक्षांच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची संख्या कमी असल्याने यापैकी केवळ एकालाच ही संधी मिळू शकते. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चित झाल्यावरच या चर्चा प्रत्यक्षात येऊ शकणार आहेत.

राष्ट्रवादीच्या आमदारांना महामंडळ?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून उपमुख्यमंत्री पवार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, असे जिल्ह्यात दोन मंत्री आहेत. त्यात माजी मंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे व खेडचे आमदार दिलीप मोहिते हे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. मात्र, राष्ट्रवादीला केवळ आणखी दोन ते तीन मंत्रिपदे शिल्लक असल्याने जिल्ह्यातून आणखी कोणाला संधी मिळणार का? याबाबत साशंकता आहे. मात्र, आता महामंडळाचे वाटप होणार असल्याने त्यात शहर आणि जिल्ह्यातील आमदारांना महामंडळाची भेट दिली जाऊ शकते, अशीची चर्चा आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news