बुलढाणा पेपरफुटी प्रकरण- पोलिसांचे विशेष तपास पथक गठीत, ‘खुपिया’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून पेपर व्हायरल, पण बिंग फुटले

बुलढाणा पेपरफुटी प्रकरण- पोलिसांचे विशेष तपास पथक गठीत, ‘खुपिया’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून पेपर व्हायरल, पण बिंग फुटले
Published on
Updated on

बुलढाणा – पुढारी वृत्तसेवा : बारावीच्या परीक्षेतील गणिताच्या पेपरफुटीच्या सखोल व व्यापक तपासासाठी पोलिस अधिक्षकांनी आता विशेष तपास पथक गठीत केले आहे. मेहकरचे एसडीपीओ विलास यामावार यांच्या नेतृत्वात साखरखेर्डा, बी बी, लोणार, सिंदखेडराजा व मेहकर या पाच पोलीस ठाण्यातील कुशल पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश करण्यात आला आहे. या अगोदर एसडीपीओ विलास यामावार व साखरखेर्ड्याचे ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी तपासाला गती देत गत तीन दिवसात चार शिक्षकांसह एकूण सात आरोपींना जेरबंद केले आहे. तपासादरम्यान पुढे येत असलेल्या माहितीवरून गणिताच्या पेपरफुटीचा हा पूर्वनियोजित कट असून त्याची व्याप्ती मोठी असण्याची चिन्हे दिसत आहेत.

सात आरोपींच्या मोबाईल कनेक्शनवरून पेपरफुटीचे आणखी धागेदोरे गवसण्याचे व आरोपींची संख्या वाढण्याचे संकेत मिळत आहेत. शुक्रवार ३ मार्चला गणिताचा पेपर सुरु होण्याच्या पाऊण तास आधी सिंदखेडराजा तालुक्यातील अनेकांच्या व्हॉट्सॲप प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती. याबाबतची माहिती एकाने तत्काळ वृत्तवाहिनीला दिल्यानंतर राज्यात सर्वत्र खळबळ उडाली होती. माहितीच्या धाग्याच्या आधारे साखरखेर्डा पोलिसांनी राजेगाव येथील परीक्षा केंद्रावरील उपप्रमुख गोपाल दामोधर शिंगणे रा. शेंदूरजन या शिक्षकाला संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या मोबाईलवरून भंडारी गावातील काही लोकांच्या व्हॉट्सॲपवर गणिताच्या प्रश्नपत्रिकेचा फोटो पाठवल्याचे दिसून आले. आरोपी गोपाल शिंगणे हा खासगी शाळेवर शिक्षक असून शेंदूरजन येथील एका शिक्षण संस्थेचा संचालक आहे. या संस्थेच्या विद्यार्थ्यांचे बारावीचे परीक्षा केंद्र हे राजेगाव येथे असून शिक्षक शिंगणे याने तेथे केंद्र उपप्रमुख म्हणून आपली सोईस्कर 'ड्युटी' लावून घेतली होती.

परीक्षेपूर्वी शिक्षक, बारावीचे विशिष्ट परिक्षार्थी व अन्य काही लोकांचा 'खुपिया' नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता. याच ग्रुपवरून त्याने प्रश्नपत्रिका व्हायरल केल्याची माहीती समोर येत आहे. भंडारी गावातील गणेश नागरे, पवन नागरे व गणेश पालवे या तिघांना गणिताचा फुटलेला पेपर याच ग्रुपवरून मिळाला होता. तपासादरम्यान, पोलिसांनी आरोपी शिक्षक गोपाल शिंगणे याची झाडाझडती घेतली असता त्याने किनगावजट्टू येथील शिक्षक गजानन आडे याच्याकडे बोट दाखवले व आडे याच्याकडून मोबाईलवर आपल्याला प्रश्नपत्रिका मिळाल्याचे सांगितले. शिक्षक आडे हा किनगावजट्टू येथील एका शिक्षणसंस्थेचा संचालक असून त्याचे विद्यार्थी बिबी येथील केंद्रावर बारावीची परीक्षा देत आहेत.

शिक्षक आडे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने गणिताच्या पेपरची फोटो प्रत आपल्याला लोणार येथील शिक्षक अ. अकील अ. मुनाफ याच्याकडून व्हॉट्सॲपवर मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर साखरखेर्डा पोलीसांनी अ. अकील अ. मुनाफ व अंकुश चव्हाण (रा. सावरगाव तेली) या दोघा शिक्षकांना बेड्या ठोकल्या.

या पेपरफुटी प्रकरणात चार शिक्षक व भंडारी गावातील तिघे असे सात आरोपी पोलीस कोठडीत आहेत. पेपरफुटीच्या कटाचे सूत्रधार आणि त्यातील सहभागी लाभार्थींना शोधून काढण्याचे कसब दाखवून पेपरफुटीचे षड्यंत्र मुळापासून हुडकून काढण्यासाठी पोलीसांचे विशेष तपास पथक गठित करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news