बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : रासायनिक प्रक्रियेनंतरचे दूषित सांडपाणी खुल्या जागेत सोडल्याने परिसरातील 50 शेतकऱ्यांची 250 एकर शेतजमीन प्रदूषित व नापिक झाली. या प्रकरणी दसरखेड एमआयडीसीतील बेंजो केमिकल कंपनीला राष्ट्रीय हरित लवादाने 250 कोटी रूपयांचा दंड केला आहे. -हास झालेल्या पर्यावरणाच्या पुनर्संचालनासाठी वापरावयाची ही दंडाची रक्कम कंपनीने 3 महिन्यांच्या आत जमा करावयाची आहे.
मलकापूर तालुक्यातील दसरखेड एमआयडीसीत गत 25 वर्षांपासून बेंजो केम ही रसायन उत्पादक कंपनी कार्यरत आहे. गत दहा वर्षापासून कंपनी खुल्या जागेवर रासायनिक दूषित सांडपाणी सोडत असल्याने लगतच्या परिसरातील 50 शेतकऱ्यांची 250 एकर शेतजमीन नापिकी होण्यासोबतच जलस्त्रोतांचेही पर्यावरणदृष्ट्या प्रचंड नुकसान झाले. कंपनीने स्वैर सोडलेले विषारी पाणी वाघोळा, म्हैसवाडी, रणथम, दसरखेड या परिसरातील विहिरींमध्ये झिरपत होते.
या हानीकारक प्रकाराला प्रतिबंध करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी बेंजो केम कंपनीविरोधात जिल्हाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. परंतु त्यावर काहीही कारवाई होत नसल्याने अखेर पीडित 50 शेतक-यांनी अॅड. साहेबराव मोरे यांच्यामार्फत पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली. लवादाने गत दहा वर्षात पर्यावरणासह शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत बेंजो कंपनीला जबाबदार धरले.
सदर कंपनीने परवान्यातील अटी, शर्ती तसेच पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 250 कोटी रूपयांचा दंड 3 महिन्याच्या आत जमा करण्याचा आदेश दिला. केमिकल कंपनीच्या एकूण वार्षिक उलाढालीच्या एक टक्का म्हणजे प्रतिवर्ष 25 कोटी रूपये याप्रमाणे गत दहा वर्षातील पर्यावरणाच्या -हासापोटी एकूण 250 कोटी रूपये महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा दंडाधिकारी, संचालक कृषी विभाग व महाराष्ट्र भूजल विभागाच्या नामनिर्देशित व्यक्तीने तयार केलेल्या आराखड्यानुसार पर्यावरण पुनर्संचालनासाठी ही रक्कम 3 महिन्याच्या आत जमा करावी, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. यामुळे पीडित शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचलंत का ?