Budget Session 2023: ‘अदानीं’च्या मुद्यावरुन संसदेत गदारोळ; सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब

Budget Session 2023: ‘अदानीं’च्या मुद्यावरुन संसदेत गदारोळ; सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: अदानी उद्योग समूहाच्या हिंडनबर्ग वित्तीय संशोधन संस्थेने दिलेल्या अहवालावर चर्चा घडवून आणण्याच्या मागणीवर विरोधी पक्षांनी गुरुवारी (दि.०२) संसदेच्या सदनात प्रचंड गदारोळ घातला. गदारोळामुळे लोकसभेचे बहुतांश कामकाज वाया गेल्याच्या चर्चा सभागृहात आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास ३१ जानेवारी रोजी सुरुवात झाली होती. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतींचे अभिभाषण झाले. त्यानंतर सरकारकडून याच दिवशी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरूवात झाली.

अर्थसंकल्प अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीच्या चर्चेला आज लोकसभेत सुरूवात झाली. दरम्यान, लोकसभेत विरोधकांनी अदानी उद्योग समूहावरील हिंडनबर्ग अहवालाचा मुद्दा लावून धरण्याचा निर्धार केल्याचे चित्र दिसले. त्या अनुषंगाने विरोधी सदस्यांनी दोन्ही सदनात स्थगन प्रस्ताव दिले होते.

गुरूवारी (दि.०२) सकाळी ११ वाजता लोकसभेचे कामकाज सुरु होताच, विरोधक आक्रमक झाले. त्यांनी 'अदानी' समूहाच्या मुद्यावर चर्चा घ्यावी, अशी मागणी लावून धरली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही मागणी फेटाळून लावत विरोधी सदस्यांना आपापल्या बाकांवर परत जाण्यास सांगितले. गोंधळ आणि घोषणाबाजी थांबत नसल्याचे पाहून अध्यक्ष बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले.

दरम्यान संसदेच्या कामकाजास सुरुवात होण्यापूर्वी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांची बैठक घेत कामकाजाच्या रणनितीवर चर्चा केली. तर तिकडे विरोधी पक्षांनीही बैठक घेत, विविध मुद्यांवर खलबते केली असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news