पुढारी ऑनलाईन – अभिनेत्री जिया खान हिच्या मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पण जिया खानची आई राबिया यांनी या प्रकरणाचा तपास अमेरिकेची केंद्रिय गुप्तचर यंत्रणा FBIकडे सोपवावा, अशी मागणी केल्याने न्यायालय चांगलेच संतप्त झाले. कोणता भारतीय कायदा परदेशातील तपास यंत्रणांकडे तपास सोपवण्याचे आदेश देऊ शकते, अशी विचारणा न्यायालयाने राबिया यांच्या वकिलांना केली. (HC dismisses demand for FBI probe into Jiah Khan's death)
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि मिलिंद जाधव यांनी याचिकेवर राबिया खान यांना चांगलेच सुनावले. या खटल्यात आता जी सुनावणी सुरू आहे, त्यात अडथळा आणण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. कोणत्या भारतीय कायद्यानुसार परदेशातील तपास संस्थांना असे आदेश देता येतात, ही विचारणा वारंवार करूनही याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी काहीही उत्तर देता आले नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
३ जून २०१३ला जिया खान तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. त्यानंतर १० जूनला रबिया यांनी पोलिसांना सुसाईड नोट सोपवली यात सूरज पांचोलीचे नाव होते. या प्रकरणात सूरज पांचोलीवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झाला. त्यानंतर ३ जुलै २०१४ला या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. पुढे सीबीआयने हा जियाचा मृत्यू आत्महत्येने झाल्याचे म्हटले.
दरम्यान राबिया खान यांनी SCARMANS या ब्रिटनमधील कायदेविषयक संस्थेकडून सीबीआयच्या तपासावर रिव्ह्यू बनवलून घेतला. या रिव्हूयमध्ये तपासात तृटी असल्याचे सांगण्यात आले. बुधवारी न्यायालयाने SCARMANSच्या अहवालावर ताशेरे ओढले. अजून सुनावणी पूर्णच झाली नसताना अशा प्रकारे टिप्पणी कशी केली जाऊ शकते, अशा शब्दांत न्यायालयाने राबिया खान आणि त्यांच्या वकिलांना खडसावले.
हेही वाचा