Rajinikanth : अमिताभ यांच्या ११ चित्रपटांचे रिमेक बनवून रजनीकांत झाले सुपरस्टार !

Rajinikanth : अमिताभ यांच्या ११ चित्रपटांचे रिमेक बनवून रजनीकांत झाले सुपरस्टार !

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथचे चित्रपट संपूर्ण भारतात अक्षरश: धुमाकूळ घालत आहेत. यामुळे बॉलिवूडला धडकी भरली आहे. या चित्रपटांनी गल्ला मिळविण्यात बॉलिवूडला पिछाडीवर टाकले आहे. त्यामुळे आता साऊथ चित्रपट विरुद्ध बॉलिवूड सिनेमा (Bollywood vs South) यशा नव्या वादाला तोंड फुटले आहे. सध्या दोन्हीकडील कलाकार वेगवेगळे विषय काढून एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. काहींनी हिंदी चित्रपटांसाठी तर इथे फक्त रिमेक चित्रपट बनतात असे टोमणे लगावले आहेत. गेल्या दशकापासून बॉलिवूडमध्ये रिमेक चित्रपटांचे (Bollywood Remake Films) युग वाढले आहे हे खरे आहे. पण ते फक्त हिंदीतच नाही. जर चित्रपटांच्या रिमेकचा मुद्दा असेल, तर दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा सुपरस्टार थलैवा रजनीकांत (Rajinikanth) यांची बुडणारी कारकीर्द एकेकाळी केवळ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या चित्रपटांच्या रिमेकमुळेच वाचली होती. तेही एक-दोन नव्हे, तर तब्बल ११ चित्रपटांचे रिमेक बनवून रजनिकांत सुपरस्टार बनले आहेत.

रजनीकांतच्या बुडत्या कारकिर्दीला अमिताभ यांच्या चित्रपटांचा आधार (Rajinikanth)

बीग बी अमिताभ बच्चन हे आपले प्रेरणास्थान असल्याचे रजनीकांत यांनी अनेकदा सांगितले आहे. दोघांनीही 'अंधा कानून', 'हम' आणि 'गिरफ्तार' सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ७०-८० च्या दशकात एक काळ असा होता, जेव्हा रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन यांच्या हिंदी चित्रपटांच्या तमिळ रिमेकमध्ये काम करून नाव आणि पैसा दोन्ही कमावले होते. याची सुरुवात १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शंकर सलीम सायमन' या चित्रपटापासून झाली. १९७७ मध्ये रिलीज झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या 'अमर अकबर अँथनी'चा हा तमिळ रिमेक होता. यानंतर १९७९ मध्ये रिलीज झालेला 'नान वाढवाईपेन' हा अमिताभ बच्चन यांच्या १९७४ मध्ये रिलीज झालेल्या 'मजबूर'चा रिमेक होता.

'डॉन'चा रिमेक असलेल्या 'बिल्ला'ने रजनीकांतला सुपरस्टार बनवले (Rajinikanth)

रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन यांच्या ११ चित्रपटांच्या तामिळ रिमेकमध्ये काम केले आहे. या चित्रपटांमुळे त्यांची कारकीर्द अखेरपर्यंत चमकवली. त्यापैकी रजनीकांत यांना सर्वाधिक फायदा झाला तो अमिताभ बच्चन यांचा 'डॉन' या चित्रपटाचा, या चित्रपटाची कथा सलीम-जावेद यांनी लिहिली होती. असे म्हणतात की हा तो काळ होता जेव्हा रजनीकांत यांनी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या बिल्ला या चित्रपटाद्वारे त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये पुनरागमन केले. १९७८ मध्ये रिलीज झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या 'डॉन'चा हा रिमेक होता. 'बिल्ला'मध्ये रजनीकांतने दुहेरी भूमिका साकारली आणि हा त्याचा पहिला मोठा व्यावसायिक हिट ठरला.

कमल हसनला मागे टाकत रजनीकांत नंबर १ बनला (Rajinikanth)

'बिल्ला'च्या यशाने रजनीकांतच्या करिअरला नवे वळण मिळाले. ज्यांनी असे म्हटले की रजनीकांत यांचे करिअर संपले ते देखील तोंडावर आपटले. सत्य हे आहे की अमिताभच्या 'डॉन'चा रिमेक असलेल्या 'बिल्ला'ने रजनीकांत यांना दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील नंबर-१ स्टार बनवले. या चित्रपटाच्या यशाने त्यांनी कमल हसन या त्यांच्या समकालीन प्रतिभावान कलाकाराला देखिल पिछाडीवर टाकले.

अमिताभ यांच्या या ११ चित्रपटांचे रजनीकांत यांनी केले रिमेक

१. डॉन- बिल्ला

अमिताभ बच्चन यांचा १९७८ चा सुपरहिट चित्रपट 'डॉन' १९८० मध्ये तमिळमध्ये 'बिल्ला' या नावाने रिलीज झाला होता. हा रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.

2. अमर अकबर अँथनी – शंकर सलीम सायमन

अमिताभ बच्चन, ऋषी कपूर आणि विनोद खन्ना स्टारर 'अमर अकबर अँथनी' हा चित्रपट रजनीकांत यांनी दोनदा दक्षिणेत रिमेक केला. १९७८ मध्ये रजनीकांत यांनी 'शंकर सलीम सायमन' नावाने तमिळमध्ये चित्रपटाचा रिमेक केला. यात विजय कुमारने शंकराची भूमिका साकारली होती, जय गणेशने सलीमची तर रजनीकांतने सायमनची भूमिका केली होती. नंतर याच चित्रपटाचा तेलगूमध्ये 'रॉबर्ट, राम, रहीम' म्हणून रिमेक करण्यात आला. यामध्ये कृष्णाने रॉबर्टची भूमिका केली, रजनीकांतने रामची भूमिका केली आणि चंद्र मोहनने रहीमची भूमिका साकारली होती.

३. खून पसीना – शिव

अमिताभ यांचा १९७७ चा सुपरहिट चित्रपट 'खून पसीना' 1989 मध्ये तमिळमध्ये रजनीकांतसोबत 'शिवा' नावाने रिलीज झाला होता.

४. त्रिशूल- श्री भरत

१९८५ मध्ये अमिताभचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'त्रिशूल'चाही रिमेक झाला होता. 'मिस्टर भारत' या शीर्षकाने रिलीज झालेल्या या चित्रपटात रजनीकांत मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट दक्षिणेतही ब्लॉकबस्टर ठरला होता.

५. लावारिस- पनक्करन

'लावारीस' चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या दमदार अभिनयाचे आजही कौतुक केले जाते. १९८१ मध्ये रिलीज झालेला हा हिंदी चित्रपट १९९० मध्ये रजनीकांत यांनी 'पनक्करन' नावाने रिलीज केला होता.

६. मर्द – मवीरन

1985 साली प्रदर्शित झालेला अमिताभ बच्चन यांचा 'मर्द' हा चित्रपट आजही त्याच्या संवादांसाठी खूप लोकप्रिय आहे. १९८६ मध्ये दक्षिणेत 'मावीरन' या नावाने चित्रपटाचा रिमेक करण्यात आला. रजनीकांत मुख्य भूमिकेत होते.

७. नमक हलाल- वेलैकरन

अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांचा सुपरहिट चित्रपट 'नमक हलाल' १९८२ मध्ये हिंदीत रिलीज झाला होता. तामिळमध्ये त्याचा रिमेक झाला. रजनीकांत यांनी 'वेलाईकरण'मध्ये पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांची भूमिका साकारली.

८. खुद्दार- पदिकथवन

अमिताभ बच्चन, विनोद मेहरा आणि परवीन बाबी स्टारर 'खुद्दार'चा तमिळमध्ये १९८५ मध्ये 'पदिकथवन' म्हणून रिमेक करण्यात आला होता. अमिताभ बच्चन यांची भूमिका रजनीकांत यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

९. दीवार- दी

यश चोप्राच्या 'दीवार'ने रुपेरी पडद्यावर जादू केली होती. या हिंदी चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शशी कपूर होते. रजनीकांतने तमिळमध्ये चित्रपटाचा रिमेक केला. अमिताभ बच्चन यांची भूमिका केली आणि 'दी' नाव दिले.

१०. मजबूर – नान वज़हवाइपेन

रवी टंडन यांनी १९७४ मध्ये 'मजबूर' दिग्दर्शित केला होता. अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. पाच वर्षांनंतर, १९७९ मध्ये रजनीकांत यांनी 'नान वहाववाईपेन' या नावाने तमिळमध्ये या चित्रपटाचा रिमेक केला.

११. कसमे वादे- धर्मथिन थलाइवन

रजनीकांत यांचा 'धर्मथिन थलायवन' हा देखील अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचा रिमेक आहे. बॉलीवूडच्या कसमे वादेमध्ये अमिताभ बच्चनसोबत रणधीर कपूर होते, तर चित्रपटाच्या तमिळ आवृत्तीमध्ये रजनीकांतसोबत प्रभू, सुहासिनी आणि खुशबू मुख्य भूमिकेत होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news