पुढारी ऑनलाईन डेस्क : रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा समारोह सोहळा आज सोमवारी (दि. २२) जानेवारी रोजी अयोध्येत नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकिय नेते आणि अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. या खास सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील अनेक स्टार्सना प्रशासनाकडून आमंत्रण दिले होतं. आमंत्रण दिलेल्यापैकी सर्व स्टार्स प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला उपस्थित राहिले. मात्र, बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार या सोहळ्याला हजर नसल्याने चर्चाचे विषय बनला आहे. यानंतर आता स्वत: अक्षयने जॉर्डनमधून पोस्ट शेअर करत आपण या सोहळ्याला उपस्थित का राहिलो नाही? याचे कारण समोर आणले आहे. ( Ram Mandir )
संबंधित बातम्या
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, आलिया भट्ट, रणबीर कपूर, विवेक ओबेरॉय, सोनू निगम, कॅटरिना कैफ, विकी कौशल, माधुरी दीक्षित, कंगना राणावत हे कलाकार पोहचले आहेत. आता या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान अक्षय कुमारला या खास सोहळ्याचे आमंत्रण दिले असूनही तो का उपस्थित राहू शकला नाही याची चर्चा रंगली आहे.
याच दरम्यान अक्षयच्या एका जवळच्या सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय सध्या जॉर्डनमध्ये असून तो अभिनेता टायगर श्रॉफसोबत आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाचे शूटिंगमध्ये बिझी असल्याची माहिती समोर येत आहे. या शूटिंगची तारीख याआधीच ठरलेली असल्याने कॅन्सन करता आलं नाही असेही ते यावेळी म्हणाले. यावरून अक्षय कुमार चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्याचे समजते. ( Ram Mandir )
दुसरीकडे अक्षयने जॉर्डनमधून अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला शुभेच्छा देताना सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अक्षय कुमारसोबत टायगर श्रॉफ हा दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, 'जय श्रीराम…राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सर्वांना खूप शुभेच्छा…जय श्री राम…माझ्यासोबत आणि टायगर श्रॉफ आहे. आम्हा दोघांकडून तुम्हा खूप साऱ्या शुभेच्छा… जगभरातील राम भक्तांसाठी आजचा दिवस खूप मोठा आहे.' याच दरम्यान टायगरनेही या शुभ दिनाच्या निमित्ताने खुपसाऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयचा हा चित्रपट अली अब्बास जफर दिग्दर्शित करत आहे.
या खास सोहळ्याला सुमारे ७ हजारांहून अधिक जणांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यात कंगना राणावत, मधुर भांडारकर, अरुण गोविल, दीपिका चिखलिया, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कॅटरिना कैफ आणि विकी कौशल असे सर्व स्टार्स अयोध्येत पोहोचले होते.