वाशीम, पुढारी वृत्तसेवा : बंजारा समाजाच्या विकासासाठी शासन सदैव सकारात्मक आहे. कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता शासन घेईल. बंजारा समाजाच्या विकासासाठी 'वनार्टी'( वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था) संस्था, तसेच नंगारा बोर्ड स्थापन करुन त्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (दि.१२) पोहरादेवी येथे केली. बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातू्च्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, सेवाध्वजाचे आरोहण व ५९३ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भुमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टॆ, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोहरादेवीचे सरपंच विनोद राठोड आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते पोहरादेवी व उमरी येथील ५९३ कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणा-या विकासकामांच्या कोनशिलेचे अनावरण झाले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,पोहरादेवी येथे आल्यावर काशीला आल्यासारखे वाटले. बंजारा समाज हा निसर्गपूजक आणि लढवय्या आहे. शासन हे सामान्य जनतेचे आहे. बंजारा समाजाच्या विकासासाठी नंगारा प्राधिकरण स्थापण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत आहे. वसंतराव नाईक महामंडळालाही निधी कमी पडू देणार नाही. तांडा सुधार योजनेत प्रत्येक तांड्यावर पाणी, रस्ते इ मूलभूत सुविधा विकासासह शाळा, दवाखाने, अंगणवाडी यासारख्या सुविधाही उपलब्ध करून देऊ,असे आश्वासनही शिंदे यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी बंजारा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी उपाययोजना करावी अशी मागणी केली. त्यासाठी बंजारा समाजाचा परिशिष्ट 'ब' मध्ये समावेश करावा. नॉन क्रिमिलेयर अट रद्द करावी, समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजनेप्रमाणे विविध योजना राबवाव्या, तांडा सुधार योजना राबवावी, भूमिहीन समाजबांधवांना जमीनीचे पट्टे द्यावे इ. मागण्या मांडल्या. आ. निलय नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. आ. इंद्रनील नाईक यांनी माजी मंत्री मनोहर नाईक यांचा संदेश वाचून दाखवला. अलका राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले.