Presidential Elections 2022 : भाजपने पाठिंबा मागण्यासाठी मातोश्रीवर यावे, शिवसेना नेतृत्वाची अपेक्षा

Presidential Elections 2022 : भाजपने पाठिंबा मागण्यासाठी मातोश्रीवर यावे, शिवसेना नेतृत्वाची अपेक्षा

मुंबई: पुढारी वृत्तसेवा: एकीकडे शिवसेनेला खिंडार पाडून शिंदे गटासोबत भाजपने राज्यात सरकार स्थापन केले असताना, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत (Presidential Elections 2022) भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा हवा असल्यास भाजपच्या नेत्यांनी मातोश्रीवर यावे, अशी अपेक्षा शिवसेनेच्या नेतृत्वाने केली आहे.

(Presidential Elections 2022) शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले आहेत. तर काही खासदार बंडाच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत. आमदारांप्रमाणे खासदारांचे बंड होऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे हे खासदारांना गेले काही दिवस स्वत्रंतपणे भेटत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत फरफटत जाण्यात पक्षाचा काही फायदा नाही. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला पाहिजे, असे खासदारांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे. त्यावर, आपण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यास तयार आहे. पण भाजपने केंद्रीय नेत्याला मातोश्रीवर पाठिंबा मागण्यासाठी पाठवावे, अशी अपेक्षा उद्धव यांनी आपल्या खासदारांमध्ये व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ठाकरे कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात होता. पण पंतप्रधान मोदी हे उद्धव यांच्यावर कमालीचे नाराज आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात पंतप्रधान मुंबई दौर्‍यावर आले. परंतु चारवेळा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून राजशिष्टाचारानुसार पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यास विमानतळावर आले नाहीत. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत राज्यात उद्धव यांनी सत्ता स्थापन केले, तरीही मोदी यांनी ठाकरे कुटुंबाशी संबंध कायम ठेवले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव यांनी मोदी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. पण मोदींकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता मातोश्रीवर भाजपकडून केंद्रीय नेता येवून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा मागावा, असे उद्धव यांचे म्हणणे आहे.

तर भाजपचे केंद्रीय नेतृत्व पूर्वीप्रमाणे आता मातोश्रींवर येणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. शिवसेनेने स्वतःहून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे शिवसेनेच्या खासदारांनी सुचविले आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news