पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी लोकसभेची तयारी प्रत्येक पक्षाने सुरू केली आहे. शिवसेनाही निवडणुकीसाठी तयार आहे. भाजप २६ जागा लढवेल. तर शिवसेनेने २२ जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे, परंतु याबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे शिंदे गटाचे प्रवक्ते व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते. भाजप – शिवसेना युतीत आधी ठरल्यापासून जागा वाटप होण्याची अपेक्षा आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेने २२ जागा लढवल्या होत्या. त्यानुसार शिवसेना २२ जागांवर दावा करणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.
दरम्यान, शिंदे गटाला आम्ही पक्ष मानत नाही. शिंदे गट म्हणजे भाजपने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर केली आहे. शिंदे गटाला आम्ही पक्ष मानत नाही. शिंदे गटाकडे स्वतःची विचारधाराही नाही. मिंधे गटाला स्वतःची भूमिका नाही, शिवसेनेला २२ काय ५ ही जागाही मिळणार नाहीत, असा दावा करून शिंदे गटाने लोकसभेच्या ४८ जागा लढविल्या तरी आम्हाला फरक पडणार नाही, असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा