आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागा जिंकू : पालकमंत्री दीपक केसरकर  | पुढारी

आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागा जिंकू : पालकमंत्री दीपक केसरकर 

मुरगूड, पुढारी वृत्तसेवा : जे लोक आम्हाला संपवायला निघाले आहेत त्यांच्याशी संगत करायची नाही. मराठी माणसाला बळ देण्याचे काम केले त्या बाळासाहेबांची शिवसेना आम्ही वाचवण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार आम्ही पुढे घेऊन जातोय. येत्या निवडणुकीत जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा जिंकू, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

मुरगूड येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नूतन सरपंच, उपसरपंच, जिन्हा नियोजन समितीचे व शेतकरी संघ प्रशासकीय नूतन सदस्यांचा सत्कार केसरकर यांच्या हस्ते व खा. संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आ. प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित होते.

आ. आबिटकर म्हणाले, नूतन सरपंच व उपसरपंचांनी काम करण्याची संधी मिळाल्याने त्या संधीचं सोनं करावे. जिल्ह्याच्या राजकारणात सर्वांचा विश्वास मिळवून पुढे जाऊया. जो काम करतो त्याच्या मागे लोक असतात. खासदार मंडलिकांचे गतिमान नेतृत्वाखाली गतिमान विकास करूया.

खा. मंडलिक म्हणाले, नव्या सरकारने राज्याला विकासाभिमुख दिशा दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी कोट्यवधीचा निधी दिला. भविष्यात हा जिल्हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला होईल. या कार्यक्रमात पालकमंत्री केसरकर यांनी आमदार प्रकाश आबिटकर हे लवकरच मंत्री होतील, असे ठाम सूतोवाच केले.

या कार्यक्रमात कविता करडे, संजय पाटील, अ‍ॅड. राणाप्रताप सासणे, गोट्या शेळके, कसबा सांगावच्या सरपंच अ‍ॅड. वीरश्री जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य सत्यजित पाटील, अतुल जोशी, मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र मंडलिक यांची भाषणे झाली. स्वागत शिवसेना कागल तालुकाप्रमुख सुधीर पाटोळे यांनी केले. जिल्हाप्रमुख राजेखान जमादार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास ‘गोकुळ’चे संचालक नंदकुमार ढेंगे, बाबा नांदेकर, सूर्याजी देसाई, जयवंत पाटील, दत्तात्रय उगले, नंदकिशोर सूर्यवंशी, केदारी रेडेकर, आर. डी. पाटील उपस्थित होते. राधानगरी तालुकाप्रमुख विनय बलुगडे यांनी आभार मानले.

खंडपीठासाठी आम्ही कटिबद्ध

कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणार आहे. तरुणांना रोजगार देण्यासाठी शेंडा पार्कची जागा लवकरच आयटी पार्कसाठी घेतली जाईल. कोल्हापुरात खंडपीठ सुरू करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे बंड केले ते बंड नसून हिंदुत्वाचा गजर केला आहे, असेही केसरकर म्हणाले.

Back to top button