पुणे : उच्च शिक्षण आता मातृभाषेतून; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती | पुढारी

पुणे : उच्च शिक्षण आता मातृभाषेतून; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अभियंता, डॉक्टर हे करिअरचे एकमेव क्षेत्र नसून, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात उत्कृष्ट काम करावे. येणार्‍या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

बालभारतीच्या 56 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण सचिव रणजित सिंग देओल, ज्येष्ठ समीक्षक व प्रमुख वक्ते डॉ. श्रीपाल सबनीस, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक, उपसंचालक औदुंबर उकिरडे, शिक्षक, पालक, विद्यार्थी आदी उपस्थित होते. सुरुवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘परीक्षा पे चर्चा’ या विषयावरील थेट प्रसारित मार्गदर्शनपर भाषण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.

केसरकर म्हणाले, आपल्या जीवनात बालभारतीचे एक आगळेवेगळे स्थान आणि महत्त्व आहे. बालभारतीचे आजवरचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. बालभारती हा पुस्तक निर्मिती करणारा विभाग असला, तरी पुढील काळासाठी चित्रफितीद्वारे लहान मुलांना शिक्षणाची सोय करण्यात येत आहे. देशात नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात येत आहे. त्यातून विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील.

प्रधानमंत्री मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाचा परीक्षांना सामोरे जाताना चांगला फायदा होईल, असे सांगून दहावी-बारावीच्या आगामी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा तणाव न घेता परीक्षांना चांगल्याप्रकारे सामोरे जाऊन यशस्वी व्हावे, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Back to top button