Ganpat Gaikwad | गणपत गायकवाडांच्या गोळीबाराचा थरार! नेमकं काय घडलं?

Ganpat Gaikwad | गणपत गायकवाडांच्या गोळीबाराचा थरार! नेमकं काय घडलं?
Published on
Updated on

उल्हासनगर; पुढारी वृत्तसेवा : कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. द्वारली गावातील जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या : 

द्वारली गावात एकनाथ जाधव यांच्या मालकीचा एक भूखंड होता. हा भूखंड आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad)यांच्या कंपनीने १९९६ साली विकत घेतला होता. तीन वेळा पैसे देऊनही जाधव कुटुंब नोंदणी कार्यालयात येत नसल्याने आमदार गायकवाड यांनी न्यायालयातून या भूखंडाची मालकी मिळवली होती. या भूखंडाला कुंपण घालण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या सुमारे २०० ते ३०० समर्थकांनी या भूखंडात घुसून कुंपणाचे नुकसान केले. याची तक्रार देण्यासाठी आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा हिललाईन पोलीस ठाण्यात आला होता. त्यावेळी त्याची तक्रार हिललाईन पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. वैभव गायकवाड यांनी याबाबत आमदार गायकवाड यांना सांगितले. त्याच दरम्यान महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे त्यांच्या टीमसह तेथे पोहचले. त्यांच्या मागोमाग आमदार गायकवाड हिललाईन पोलीस ठाण्यात पोहचले. (MLA Ganpat Gaikwad)

हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात दोन्ही गट बसलेले होते. त्याचवेळी वैभव गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये दालनाबाहेर वाद झाल्याने गोंधळ निर्माण झाला. हा वाद सोडविण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप हे बाहेर गेले असताना आमदार गायकवाड यांनी त्यांची परवानाधारी बंदूक बाहेर काढून महेश गायकवाड यांच्यावर पाच तर राहुल गायकवाड यांच्यावर एक गोळी झाडली. (MLA Ganpat Gaikwad)

याचवेळी गोळीबाराच्या आवाजाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप हे पुन्हा दालनात परतले. त्यावेळी आमदार गायकवाड हे महेश गायकवाड यांच्या अंगावर रिव्हॉल्वरच्या दस्त्याने त्याला मारहाण करीत होते. जगताप यांनी तात्काळ आमदार गायकवाड यांच्या हातातील रिव्हॉल्वर खेचून घेतले. त्याचवेळी आमदार गायकवाड यांचा खासगी अंगरक्षक हर्षल केणे याने दालनात येऊन त्याच्याकडील परवानाधारक रिव्हॉल्वरने महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरू केले. त्यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडील रिव्हॉल्वर खेचून घेत दोघांना ताब्यात घेतले.

या गोळीबारात कल्याण शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांना पाच गोळ्या लागल्या आहेत. तर बैलगाडा फेम राहुल पाटील यांना एक गोळी लागली आहे. या दोन्ही जखमींना उल्हासनगरच्या मिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना ठाण्याच्या जुपिटर रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी महेश गायकवाड यांच्यावर शस्त्रक्रिया करून पाच गोळ्या त्यांच्या शरीरातून काढण्यात आल्या. सकाळी सात वाजता आमदार गायकवाड, हर्षल केने, संदीप सरवणकर, वैभव गायकवाड, नागेश बडेकर, विकी गणोत्रा आणि इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर तात्काळ आमदार गायकवाड, हर्षल केणे आणि संदीप सरवनकर यांना अटक करून त्यांची रवानगी कळवा पोलीस ठाणे येथे करण्यात आली. (MLA Ganpat Gaikwad)

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार न्यायालय सुनावणी

भाजप आमदार गायकवाड आणि त्यांचे दोन साथीदार यांना शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार होते. त्यामुळे न्यायालय परिसरात आमदार गायकवाड समर्थक आणि महेश गायकवाड समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. यावेळी दोन्ही गटात वादंग होण्याची शक्यता, तसेच आमदार गायकवाड यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना न्यायालयात थेट हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सुनावणी पार पडणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news