नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आगामी महापालिकेच्या निवडणुकांसह २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमने महाविकास आघाडीसोबत आघाडी करण्याची ऑफर दिली आहे. या संदर्भात आता शिवसेना सत्तेकरीता नेमकी काय करते हे पाहायचे आहे. तसेही शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारले आहे आणि अजानची स्पर्धा वगैरे चालली आहे. त्याचा परिणाम आहे का ते पाहू, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज नागपुरात माध्यमांशी बोलताना केली.
एमआयएमच्या ऑफरबाबत काही हरकत नाही. शेवटी ते सर्व एकच आहेत. अंतिमत: भाजपाला पराभूत करण्याकरीता सगळे एकत्रित येण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, कोणी कितीही एकत्रित आले, तरी जनता मोदींच्या मागे असून ती भाजपालाच निवडून देईल. फक्त आता या आघाडीमध्ये शिवसेना काय करणार ? याकडे आमचे लक्ष असेल, असे फडणवीस म्हणाले. एमआयएमला भाजपाची बी टिम म्हटले जायचे. आता त्याच बी टिमसोबत ते आघाडी करीत आहेत, या संदर्भात विचारले असता, ते हारले की त्यांना ईव्हीएम आणि ए टू झेड साऱ्या टीम दिसतात. हारल्यानंतर अशा अनेक गोष्टी ते बोलतात. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
नवाब मलिकांचे केवळ खाते काढणे पुरेसे नाही. संवैधानिक पदावरील व्यक्ती तुरूंगात असताना पदावर राहाणे योग्य नाही. राजू शेट्टी भाजपासोबत येण्याबाबत अजून माझी काही चर्चा झालेली नाही. मुळातच राजू शेट्टी आमच्यासोबत होते. काही कारणाने ते पलिकडे गेले. त्यांच्याबाबत आत्ताच काही सांगणे योग्य नाही. मोदींनी शेतकरी हिताचे जेवढे निर्णय घेतले तेवढे इतर कोणीही घेतलेले नाही. साखर कारखानदार तसेच ऊस उत्पादकांकरीता मोदींनी अनेक निर्णय घेतले. इतरांनी फक्त ते लक्षात ठेवावे एवढीच अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : 'झुंड' मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie