YouTuber Elvish Yadav | रेव्ह पार्ट्यांसाठी मीच सापाचे विष ऑर्डर केले, बिग बॉस OTT विजेता एल्विश यादवची कबुली

YouTuber Elvish Yadav
YouTuber Elvish Yadav

पुढारी ऑनलाईन : बिग बॉस OTT विजेता आणि YouTuber एल्विश यादव याने रेव्ह पार्ट्यांसाठी साप आणि सापाचे विष ऑर्डर केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोएडा येथे एका पार्टीत सापाच्या विषाचा ड्रग म्हणून वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सर्व आरोपींना तो भेटल्याची कबुलीही त्याने दिली आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

एल्विश यादव याला रविवारी (दि. १७) या प्रकरणाच्या तपासादरम्यान नोएडा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी नोएडाच्या सेक्टर ४९ पोलिस स्टेशनमध्ये सहा जणांविरुद्ध एफआयआर नोंद असून त्यात एल्विशच्या नावाचा समावेश होता. सर्पमित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इतर पाच संशयित आरोपींना नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. पण सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२, भारतीय दंड संहिता कलम १२० बी (गुन्हेगारी कट), २८४ (मानवी सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या विषाशी संबंधित निष्काळजी वर्तन) आणि २८९ (प्राण्यांबाबत निष्काळजी वर्तन) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्याच्या कलम २९ अंतर्गतही आरोप ठेवण्यात आले आहेत. यापूर्वीच्या फॉरेन्सिक अहवालात गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये सापाचे विष असल्याची पुष्टी झाली होती. दरम्यान, एल्विशने या प्रकरणात त्याचा सहभागी असल्याच्या आरोपांचे अनेकवेळा खंडन केले होते.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news