‘बापल्योक’ १ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

baaplyok movie
baaplyok movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाप म्हणजे धाक.. बाप म्हणजे कडक शिस्त..बाप म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा रक्षणकर्ता! पण.. आहे तर तो ही माणूसच ना.. लहानपणापासून आपणच वडिलांबद्दल घालून दिलेली ही भीती पुढे वडील-मुलाच्या नात्यात असा काही अवघडलेपणा निर्माण करते की त्यांच्या मनातलं आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. अशाच एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची गंमतीशीर गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे 'बापल्योक'.

नातं' या एका शब्दात व्यक्तीच्या जन्मापासून ते मरेपर्यंतच्या प्रवासाचं गुपित दडलंय. माणसाच्या आयुष्यात कित्येकदा नात्याला वळण देणाऱ्या घटना घडतात, या घटनांमधून नात्यांचा तोल सावरलाही जातो; पण खरा गोंधळ उडतो मनं सांभाळताना, त्यावेळी नातं जास्त न ताणता हुडकायचा प्रयत्न करायचा. अशाने नात्याची प्रत्येक नाजूक गाठ विश्‍वासानं आणि प्रेमानं आपोआप पक्की होईल. हीच गोष्ट सांगू पाहणारा दिग्दर्शक मकरंद माने यांचा 'बापल्योक' हा चित्रपट १ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'बापल्योक' या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. 'नाईंटीनाईन प्रोडक्शन्स'चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स'च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

वडील आणि मुलगा यांच्यातील नात्याचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उलगडत जाणारा अर्थ, नव्याने सांधले जाणारे बंध, याचा सुरेख मेळ 'बापल्योक' या चित्रपटातून साधला आहे. चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे यांनी साकारली आहे. या दोघांसोबत अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे चित्रपटात दिसणार आहेत.

'बापल्योक' चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे. 'बापल्योक' हा चित्रपट १ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news