मेट्रोस्थानकांच्या नावात महापुरुषांच्या नावाचा एकेरी उल्लेख टाळा : अंबादास दानवे

मेट्रोस्थानकांच्या नावात महापुरुषांच्या नावाचा एकेरी उल्लेख टाळा : अंबादास दानवे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मेट्रोने पुण्याची आणि महाराष्ट्राची अस्मिता जपत, पुण्यातील मेट्रो मार्गांना महापुरुषांची नावे द्यावीत कोणत्याही कंपन्यांची नावे दिलेली आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिला. त्यासोबतच मेट्रो प्रशासनाने मेट्रोत रोजगारासाठी स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. पुणे दौऱ्यावर असताना शुक्रवारी अंबादास दानवे यांनी मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी ते बोलत होते. त्यानंतर त्यांनी सिविल कोर्ट मेट्रो स्टेशन ते पिंपरी चिंचवड मेट्रो स्टेशन असा मेट्रो ट्रेनने प्रवास केला. यावेळी महामेट्रोचे कार्यकारी संचालक तथा जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे, शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर यांच्यासह अनेक शहर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

लोकांची मते घेऊन पुण्याचा अभिमान वाटेल, अशी नावे मेट्रो स्थानकांना द्यायला हवीत, रुबी हॉल, वनाज, एसएनडीटी या मेट्रो स्थानकांना महापुरुषांची नावे द्यावी, त्यासोबतच एकेरी उल्लेख असलेल्या स्थानकांच्या नावात बदल करावा, आणि छत्रपती शिवाजीनगर आणि छत्रपती संभाजी उद्यान अशी स्थानकांची नावे द्यावीत, असे विरोधी पक्षनेते दानवे यांनी सांगितले. यासंदर्भात महा मेट्रोचे सोनवणे म्हणाले, नावे बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्या संदर्भातील पत्रव्यवहार झाला असून, राज्य शासनाने सांगितल्याप्रमाणे समिती स्थापन केली आहे. मेट्रो, महापालिका, राज्यशासनाचे प्रतिनिधी असलेली ही समिती बनविण्यात आली आहे.

पुणेकरांना पार्किंगची व्यवस्था करून द्या…
पुण्यात मेट्रोची 30 स्थानके आहेत. त्यापैकी 60 ठिकाणीच पुणेकरांना पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे उर्वरित 23 ठिकाणी पुणेकरांना पार्किंगची व्यवस्था नाही त्यामुळे राज्य शासनाने यात लक्ष घालून पुणेकरांना पार्किंगच्या जागा उपलब्ध करून द्याव्यात असे यावेळी दानवे यांनी सांगितले.

मेट्रोची वारंवारिता वाढवा…
सध्या मेट्रोचे प्रवासी वाढत आहेत. पिक अवर आणि वीकेंडला प्रवाशांची प्रचंड गर्दी असते, मेट्रोत उभं राहायला देखील प्रवाशांना जागा नसते त्यामुळे मेट्रो प्रशासनाने गाड्यांची वारंवारिता दहा मिनिटांनी ऐवजी सहा मिनिटांपर्यंत करावी आणि लागल्यास गाड्यांची संख्या देखील वाढवावी, असे दानवे यांनी यावेळी सांगितले, त्याबाबत सोनावणे म्हणाले, मेट्रोत कर्मचारी 380 आहेत, त्यापैकी 300 कर्मचारी महाराष्ट्रीयन आहेत. तसेच, दिवसाला मेट्रोच्या 160 फेऱ्या होतात. त्याद्वारे रोज 55 हजारांच्या घरात प्रवासी प्रवास करतात. आणखी प्रवासी वाढल्यास मेट्रोची वारंवारिता 5 मिनिटांपर्यंत करता येईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news