न्यूयॉर्क ; वृत्तसंस्था : वादग्रस्त लेखनाबद्दल इराणकडून मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले प्रख्यात लेखक सलमान रश्दी यांच्यावर पश्चिम न्यूयॉर्कमध्ये चाकूहल्ला झाला आहे. शुक्रवारी रात्री करण्यात आलेल्या या हल्ल्यात रश्दी जखमी होऊन कार्यक्रमस्थळीच कोसळले. हल्लेखोराला लगेच ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती कितपत गंभीर आहे हे लगेच कळू शकले नाही.
चौताकुआ इन्स्टिट्यूशन या संस्थेतर्फे रश्दी यांना व्याख्यान देण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यांची ओळख करून दिली जात असताना अचानकपणे एक व्यक्ती व्यासपीठाच्या दिशेने आली आणि तिने रश्दी यांना चाकूने भोसकले. या घटनेनंतर व्यासपीठावर आणि प्रेक्षकांत प्रचंड गोंधळ उडाला. हल्ल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी रश्दी यांच्याभोवती कडे केले. रश्दी यांच्या शर्टावर रक्ताचे डाग आढळले आहेत. तसेच तेथील भिंतीवरही रक्ताचे काही थेंब उडाल्याचे दिसले आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. पोलिसांनी हल्लेखोराला झडप टाकून ताब्यात घेतले असून त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. सलमान रश्दी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर तातडीने सारे सभागृह मोकळे करण्यात आले.
सॅटनिक व्हर्सेस या वादग्रस्त पुस्तकाच्या लेखनामुळे रश्दी यांच्याविरोधात इराणने 1980 मध्ये मृत्युदंडाचा फतवा जारी केला होता. तसेच त्यांची हत्या करणार्याला 30 लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.