पुढारी ऑनलाईन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २०२३ च्या क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी स्टेडियममध्ये सुमारे १ लाख ३० हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यापैकी बहुतांश रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला पाठिंबा देणारे असतील. यावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Australian captain Pat Cummins) याने प्रतिक्रिया दिली आहे. गर्दीचा दबाव वाटणार नसून त्यांचा संघ त्यांच्या मागील अनुभवावरुन खेळेल, असे कमिन्सने म्हटले आहे. (World Cup 2023 Final)
संबंधित बातम्या
ऑस्ट्रेलियन संघासमोर कोणत्या भारतीय खेळाडूचे आव्हान असेल, या प्रश्नाला उत्तर देताना कमिन्स म्हणतो, "भारत हा एक चांगला संघ आहे. मोहम्मद शमी हा मोठा (धोका) आहे."
क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्याच्या खेळपट्टीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कमिन्सने म्हटले की, "दोन्ही संघांसाठी हे स्पष्टपणे सारखेच आहे. आपल्याच देशात खेळण्याचे काही फायदे आहेत यात शंका नाही. पण आम्ही इथे खूप क्रिकेट खेळलो आहोत."
"आम्ही भारतात याआधी खेळलो आहोत त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी ही काही आमच्यासाठी नवीन गोष्ट नाही. डेव्हिड वॉर्नर सारखा कोणीतरी नाचत असेल…," असे कमिन्सने अंतिम सामनापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितले. "हा एक समान सामना आहे. २०१५ मध्ये विश्वचषक जिंकलेल्या संघातील ६-७ खेळाडू आमच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांना याचा अनुभव आहे आणि ते धाडसाने खेळतील."
या विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करुन अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी होणार आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ६ सामन्यांत सर्वाधिक २३ विकेट्स घेतल्या आहेत. विरोट कोहली, शमी जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने भारताच्या विश्वचषक जिंकण्याची आशा वाढल्या आहेत. (World Cup 2023 Final)