औरंगाबाद : कोरोना लस न घेताच ८० जणांनी घेतले बोगस प्रमाणपत्र

औरंगाबाद : कोरोना लस न घेताच ८० जणांनी घेतले बोगस प्रमाणपत्र
Published on
Updated on

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या मेल्ट्रॉन लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक लस न घेताच ८० जणांनी बोगस लसीकरण प्रमाणपत्र काढले असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री उशीरा उघडकीस आला. हस्ताक्षरातील बदलावरून हे प्रकरण उघड झाले असून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने बोगस प्रमाणपत्र देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

हे प्रकरण लक्षात आल्यानंतर औरंगाबाद महापालिका प्रशासनाने तत्काळ कारवाई करत एमआयडीसी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणातील संबंधितांना बडतर्फ करण्यात आले आहे. ९ ते ३१ मार्च या कालावधीत तब्बल ८० बोगस लसीकरण प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आले. नोंद होणाऱ्या रजिस्टरमधील हस्ताक्षरातील बदलामुळे हा प्रकार समोर आला. यात डॉ. कॅमेडी झेन मॅथ्यू (रा. मुकुंदवाडी) आणि साबरी मोहम्मद इमरान (रा. चंपा चौक) यांच्या विरोधात महापालिका प्रशासनाच्या वतीने एमआयडीसी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

१८ ऑक्टोबर २०२१ पासून मॅल्ट्रॉन सेंटरवर लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली होती, त्यामुळे असे शेकडो प्रमाणपत्र वाटण्यात आले असल्याची शंका व्यक्त होत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. आता कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याने अनेक लोक लस घेण्यास तयार नाही, मध्यंतरी प्रशासनाने लसीकरण अनिवार्य केल्याने अनेकांनी लस न घेताच प्रमाणपत्र काढण्याचा मार्ग अवलंबला होता. शहरात यापूर्वी देखील असे प्रकार समोर आले आहेत.

बोगस प्रमाणपत्रांचा मोठा घोटाळा ?

मेल्ट्रॉन रुग्णालयामध्ये १८ ऑक्टोंबर २०२१ पासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले, हा प्रकार घडल्यानंतर केवळ मार्च महिन्याच्याच नोंदी तपासण्यात आल्या. त्यामुळे यापुर्वीही या सेंटरवरुन असे प्रकार घडले असल्याची शंका असून या ठिकाणी मोठा घोटाळा उघड येण्याची शक्यता आहे. या सेंटरवर कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन  अशा दोन्ही लस उपलब्ध आहेत. आता तपासण्यात आलेली बोगस प्रमाणपत्रे ही ९ मार्च पासून पुढची असल्याचे निदर्शनास आले आहे.

५ जणांची समिती करणार चौकशी 

याप्रकरणी मनपा प्रशासनाच्या वतीने ५ जणांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. यात डॉ. मनीषा भोंडवे, डॉ. संगीता पाटील, डॉ. मेघना जोगदंड,  मीना ठोकळ, डॉ. प्रेरणा संकलेचा यांचा समावेश आहे. तीन दिवसात ही समिती आपल्या चौकशीचा अहवाल देईल, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

हे वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news