औरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार

औरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : नवरात्राचा उपवास सोडण्यासाठी लागणारी अंबाड्याची भाजी आणण्यासाठी शेतात गेलेल्या 58 वर्षीय महिलेला एकटी गाठून नराधमाने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. कान, नाक व गळ्यातील दागिने ओरबाडून नराधम पसार झाला. सोमवारी (3 ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहा वाजता वाळूज भागातील जिकठाण शिवारात ही संतापजनक घटना घडली. गुन्हे शाखा पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवून मंगळवारी पहाटे नराधमाला बेड्या ठोकल्या. गुन्हे शाखेचे अंमलदार धर्मा गायकवाड आणि सुरेश भिसे यांनी ही कामगिरी केल्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.

शक्तूर लक्षाहरी भोसले (25, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. तो रेकॉर्डवरील दरोडेखोर आहे. पोलीस निरीक्षक आघाव यांनी दिलेल्या माहितीनूसार, वाळूज भागात राहणारी ५८ वर्षीय शेतकरी महिला ३ ऑक्टोबरला दुपारी वाळूज गावात आठवडी बाजाराला गेली. बाजार करून दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्या खासगी वाहनाने लिंबेजळगावपर्यंत जाऊन तेथून पायी जिकठाण शिवारातील शेतात गेल्या. ४ ऑक्टोबरला नवरात्राचे उपवास सुटणार असल्याने त्यांनी उपवास सोडण्यासाठी लागणारी अंबाड्याची भाजी शेतातून घेतली. अंदाजे सहा वाजता त्या घराकडे पायी निघाल्या. काही अंतर गेल्यावर सव्वासहा ते साडेसहाच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती समोरून आल्याचे त्यांना दिसले. नराधमाने त्यांचा पाठलाग करून चाकूचा धाक दाखवून बाजुच्या कपाशीच्या शेतात ओढत नेले. त्यानंतर अंगावरील दागिने देण्यासाठी धमकावले. महिलेने त्याला विरोध करताच त्याने तोंड, पोट आणि पाठीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर ३ ग्रॅमचे मंगळसूत्र व १ ग्रॅमचे कानातील दागिने ओरबाडून घेतले. महिलेने आरडाओरड केला मात्र, आसपास कोणीही नसल्याने मदतीसाठी कोणी आले नाही.

अन् नराधमाची नियत फिरली

नराधम आरोपी दागिने ओरबाडून शांत झाला नाही. त्याची अचानक नियत फिरली. दागिने व २६०० रुपये रोकड हिसकावल्यानंतर त्याने महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. या किळसवान्या प्रकारामुळे महिला प्रचंड दहशतीत आहे. कूकर्म केल्यावर आरोपी तेथून पसार झाला.

मोबाइल घटनास्थळी पडल्याने पटली ओळख

पळून जाताना नराधमाचा मोबाइल घटनास्थळी पडला होता. पीडित महिलेने ते पाहिले आणि तो पळून गेल्यावर पीडिता मोबाइल घेऊन गावात आली. तीने नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. त्यांनी तत्काळ वाळूज ठाणे गाठून पोलीस निरीक्षक सचिन इंगाेले यांना हकिकत सांगितली. घटनास्थळावरील मोबाइल पोलिसांकडे जमा केला.

रात्रभर सुरु होती शोधमोहीम

घटनास्थळी मोबाइल सापडल्याने पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपी ओळख निष्पन्न झाली. मात्र, त्याला पकडण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांपुढे होते. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी उपायुक्तांसह गुन्हे शाखा निरीक्षक अविनाश आघाव, वाळूजचे सचिन इंगोले यांना तपासाच्या सुचना केल्या. आघाव यांनी पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के, अजित दगडखैर यांच्यासह अंमलदार संजय नंद, संदीप तायडे, नितीन देशमुख, अजय चौधरी, अजय दहिवाळ, राजाराम डाखुरे, दादासाहेब झारगड यांच्या पथकाला कामाला लावले. त्यांच्या वेगवेगळ्या सहा टीम बनविल्या. अंमलदार धर्मा गायकवाड, सुरेश भिसे यांना आरोपीची माहिती देणारा एक खबऱ्या मिळाला. त्याला सोबत घेऊन ते खासगी कारने वाळूज भागातील राजुरा, गाजगाव, बिडकीन, ढोरकीन, लोहगाव येथे संशयित आरोपीचा तपास केला.

अन् कुटुंबासह पळून जाताना अडकला

धर्मा गायकवाड आणि सुरेश भिसे यांना कमळापूर रोडने संशयित आरोपी शकतूर भोसले हा पत्नी, तीन मुलांसह दुचाकीने जाताना दिसला. तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. गायकवाड व भिसे यांनी त्याला हेरले. त्याला संशय येऊ न देता खासगी कारने त्याचा पाठलाग सुरु ठेवला. जवळपास दहा किमीचा पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी नराधम शकतूरला पकडले.

नराधम भोसलेवर सात गुन्हे

नराधम शकतूर भोसलेविरुद्ध सिल्लेगाव, गंगापूर, वैजापूर, पूर्णा (जि. परभणी) या ठाण्यात तब्बल सात गुन्हे दाखल आहेत. यात दरोडा, लुटमार, वाटमारी आदी गुन्ह्यांचा समावेश असून वाटमारी व बलात्काराचा हा आठवा गंभीर गुन्हा आहे. वाळूज ठाण्यातील या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एन. शेळके करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news