पुढारी ऑनलाईन डेस्क : २३ ऑगस्ट'ला चांद्रयानाचे 'विक्रम' लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरले आणि चंद्रावर तिरंगा फडकवला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला. भारताच्या अंतराळ मोहिमेतील २३ ऑगस्ट हा सुवर्णदिवस यापुढे 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' (National Space Day) म्हणून साजरा केला जाणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळूरूच्या इस्रो मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली.
ग्रीस दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी बंगळुरूला पोहोचले. त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मुख्यालयात इस्रोचे शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि चांद्रयान-३ च्या यशाबद्दल शास्त्रज्ञांचे कौतुक केले. चांद्रयान-३ लँडिंग हा खूप आनंदाचा क्षण होता आणि शास्त्रज्ञांना शुभेच्छा देण्यासाठी देशात परतताच सर्वांना भेटण्याची इच्छा होती, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
चांद्रयान-३ चा लँडर ज्या ठिकाणी उतरले ते ठिकाण 'शिवशक्ती' म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. तसेच चांद्रयान-३ चंद्रावर उतरला तो दिवस म्हणजे २३ ऑगस्ट हा दिवस आता 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' (National Space Day) म्हणून ओळखला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. "२३ ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर राष्ट्रीय ध्वज फडकवला. आतापासून तो दिवस भारतात राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून ओळखला जाईल", असे मोदी म्हणाले.
हेही वाचा :