सांगली : करगणीला ढगफुटी सदृश्य पावसाचा तडाखा; आठवडी बाजारातील भाजीपाला गेला वाहून

ढगफुटी सदृश्य पाऊस आटपाडी
ढगफुटी सदृश्य पाऊस आटपाडी

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील आटपाडी, करगणी आणि खरसुंडी परिसराला गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपले. करगणीच्या आठवडा बाजारामध्ये आलेल्या पावसाने व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. आठवडा बाजारात व्यापारी व शेतकरी यांनी आणलेला भाजीपाला व फळे जोरदार पावसाने आलेल्या पाण्यात वाहून गेली. यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गुरुवारी (दि.४) रोजी सायंकाळच्या सुमारास करगणी, खरसुंडी, बनपुरी परिसरात जोरदार पाऊस झाला. करगणीचा आठवडा बाजारात करगणी परिसरातील गोमेवाडी, बनपुरी, काळेवाडी, तळेवाडी, बाळेवाडी व अन्य वाड्या- वस्तीवरील लोक भाजीपाला खरेदी व विक्रीसाठी आले होते. याच दरम्यान दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने व्यापाऱ्यांसह सर्वांची तारांबळ उडविली. या बाजारात शेतकऱ्यानी व व्यापाऱ्यांनी आणलेला भाजीपाला व फळे पावसाच्या पाण्याने वाहून गेली. करगणी गावात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसाने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. जोरदार पावसाने अनेक ठिकाणची शेती पाण्याखाली गेली आहे.

करगणी आठवडी बाजार हा ग्रामपंचायत शेजारी भरतो. बाजार परिसर हा मुख्य रस्त्यापासून उतारावर असल्याने एस.टी. स्टँड परिसर ते शेटफळे चौकपासून पडणारे पावसाचे पाणी हे बाजाराच्या आवारातून वाहते. वेगाने वाहणाऱ्या पाण्यात बाजारात आलेल्या सर्वाचे साहित्य वाहून गेले. यामुळे पुन्हा पाऊस आल्यास तारांबळ होवू नये म्हणून प्रशासनाने नियोजन करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

आटपाडी परिसरासह दिघंची ही मुसळधार पाऊस झाला. खरसुंडी आणि करगणी परिसरात सायंकाळी जोरदार पाऊस पडला. दिघंची येथे २० मिलिमीटर, आटपाडी येथे ३४ मिलिमीटर तर खरसुंडी येथे ५५ मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. तर करगणी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असला तरी पर्जन्यमापक यंत्रणा नसल्याने नेमका किती पाऊस झाला हे समजू शकले नाही.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news