बारामतीमध्ये भरधाव डंपरने चिरडल्या १७ मेंढ्या | पुढारी

बारामतीमध्ये भरधाव डंपरने चिरडल्या १७ मेंढ्या

बारामती, पुढारी वृत्तसेवा: भरधाव वेगाने आलेल्या डंपरने रस्त्याने जाणाऱ्या मेंढ्या अक्षरक्ष चिरडत नेल्या. या घटनेत १७ मेंढ्या चिरडल्या गेल्या आहेत. बारामतीतील इंदापूर रस्त्याला जोडणाऱ्या बाह्यवळण मार्गावर शुक्रवारी ५ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. जीवापाड जपलेल्या मेंढ्या डोळ्यादेखत डंपरखाली चिरडल्या गेल्याने मेंढपाळ महिलेने मोठा आक्रोश केला.

या अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी थांबविण्यात आली होती. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडीक यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. डंपर क्रमांक (एमएच ११ सीएच ७५११) हा माळावरच्या मार्गावरून इंदापूर रस्त्याकडे निघाला होता. यावेळी या डंपरने रस्त्यावरून जाणाऱ्या मेंढ्या चिरडल्या. काही अंतरावर जावून तो थांबला. या घटनेत मेंढ्यांचा चेंदामेंदा झाला. संभाजी मोठे या मेंढपाळाच्या मेंढ्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर मेंढपाळ महिलेने केलेला आक्रोश उपस्थितांची मने हेलावून गेला.

भाजपचे अभिजित देवकाते यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मेंढपाळांना नुकसान भरपाई दिल्याशिवाय डंपर नेऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरु करत बंदोबस्त ठेवला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद झालेली नाही.

Back to top button