मालवण; पुढारी वृत्तसेवा : मालवण तालुक्यात गणपती बाप्पाचे आगमन सर्वत्र झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणचे सार्वजनिक गणपती बाप्पा विविधांगी रूपांनी नावाजलेले आहेत. अशातच मालवण तालुक्यातील मसुरे कावावाडी येथील समीर पेडणेकर आणि त्यांच्या एकत्रित कुटुंबातील गणपती आगळ्यावेगळ्या परंपरेच्या दृष्टीने प्रसिद्ध आहेत. पेडणेकर कुटुंबियाच्या या बाप्पाला दर दिवशी तब्बल ३० ताटांचा नैवेद्य दाखविला जातो. यामुळे हा गणपती बाप्पा तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण गणपती म्हणून गणला गेला आहे.
मसुरे कावावाडी येथील सहा जणांचे पेडणेकर कुटुंबिय गणेश चतुर्थीनिमित्त एकत्रित येत मोठ्या उत्साहाने सण साजरा करतात. यावेळी प्रत्येक कुटुंबाची पाच ताटे अशी एकूण तीस ताटांचे प्रती दिवशी नैवेद्य दाखविण्यात येतो. कावाडीतील पेडणेकरांचे घर हे सर्वात मोठे घर म्हणून ख्याती आहे. या घराची लांबी एकशे दहा फूट असून रुंदी पंचावन्न फूट आहे. या गावात गणपतीला आलेला मुबंईतील चाकरमानी सुद्धा न चूकता भेट देतो. कारण व्यावसाईक रंगभूमीवरील नाट्य निर्माते दिनू पेडणेकर यांचे हे घर आहे.
पेडणेकर कुटुंबियांच्या या मानाच्या गणपतीला तीस नैवेद्याची ताटे बनविण्यापूर्वी जेवणातील पदार्थ सुद्धा अगोदर सर्व महिला विचारविनिमय करून ठरवितात. जेणेकरून कुठलाही पदार्थ डबल होऊ नये याची काळजीही रोज नित्यनियमाने घेतली जाते. त्यामुळे रोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या व गोड पदार्थ खायला मिळतात. गणपतीला नैवेद्य दाखविल्यानंतर नैवेद्याची ताटे घेऊन कुटुंबियांची तसेच आलेल्या पाहुण्यांची पंगत बसते. या पंगतीला अगोदर पुरुष मंडळी लहान मुलं आणि घरातील स्त्रिया जेवायला बसतात. नोकरी धंद्यानिमित्त बाहेरगावी असणारे या परिवारातील सदस्य गणेश चतुर्थीला गावी येत असल्यामुळे गणपतीचे अकरा दिवस घरात आनंदाचा वातावरण असते. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने विखुरलेला पेडणेकर परिवार एकत्रितरित्या गेट टूगेदर साजरा करतो.
हेही वाचलंत का?