कोल्हापूर : गणेशोत्सव उलाढालीत 30 टक्के वाढ अपेक्षित | पुढारी

कोल्हापूर : गणेशोत्सव उलाढालीत 30 टक्के वाढ अपेक्षित

कोल्हापूर; सुरेश पवार :  कोरोना काळानंतर यंदाच्या वर्षी विघ्नहर्त्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात आगमन झाले आहे. दहा दिवसांच्या चैतन्य सोहळ्यात आबालवृद्ध आणि सारा देशच सहभागी झाला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारी बाजारपेठेतील उलाढाल आता देशाच्या अर्थव्यवस्थेत वैशिष्ट्य बनत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात 20 हजार कोटींहून अधिक उलाढाल होईल, असा अंदाज आहे. हा अंदाज ‘असोचेम’ने वर्तवलेला आहे.

गणेशोत्सवानिमित्त होणारी उलाढाल ही सामाजिक अर्थकारण म्हणून ओळखली जाते. या उलाढालीत हजारो सर्वसामान्य लोकांच्या, कष्टकर्‍यांच्या, श्रमजीवींच्या हाताला काम मिळते. फुले, फळे, नारळ या माध्यमातून कृषी क्षेत्रात, कृषी बाजारपेठेत उलाढाल होते. मिठाई उद्योगातून दूध व्यवसाय आणि हलवाई उद्योगाला चालना मिळते. सजावटीच्या व्यवसायात कुटिरोद्योगांना काम मिळते. विद्युत उपकरणांच्या बाजारपेठेतील उलाढाल या व्यवसायात तेजी आणते. विविध वस्तूंच्या विक्रीसाठी हजारो फेरीवाले राबत असतात. या सार्‍या उलाढालीतून हजारो कुटुंबांची दोन महिन्यांची बेगमी सहजच होत असते. असा अंदाज आहे.

गतवर्षीपेक्षा उलाढालीत वाढ

गतवर्षीपेक्षा यंदा गणेशोत्सवातील उलाढाल 30 टक्क्यांनी वाढेल, असा ‘असोचेम’चा अंदाज आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने हजारो कुटुंबांना श्रीगणरायाचा आर्थिक आशीर्वाद मिळत आहे, हेही या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

विमा कवच

गणेशोत्सवासाठी मोठे मंडप उभारण्याचा ट्रेंड आहे. मोठ्या भव्य मूर्तीकडे सार्वजनिक मंडळांचा कल वाढत चालला आहे. झगमगत्या नेत्रदीपक विद्युत सजावटी आणि अद्ययावत साऊंड सिस्टीम आता अपरिहार्य बनलेली आहे. या सर्वांचा विमा उतरवण्याचा प्रघात सुरू झाला आहे. गणेशोत्सवाच्या उलाढालीत हा एक नवा व्यवसाय आकाराला येत आहे.

चिनी मालाचे सावट

गणेशोत्सवासह अनेक भारतीय सणामध्ये चिनी मालाची विक्री मोठ्या प्रमाणात होते. किंबहुना चिनी मालाचे इथल्या बाजारपेठेवर कब्जाच केला आहे. सजावट साहित्य, विद्युत उपकरणे, साऊंड सिस्टीम, फटाके यामधील चिनी मालाचे वर्चस्व लक्षणीय आहे. गलवान प्रकरणानंतर चिनी मालावर बहिष्काराची लाट आली; पण प्रत्यक्षात अद्यापही बाजारपेठेत चिनी मालाची उपस्थिती मोठी
आहे.

Back to top button