

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : ढोल-ताशांचा गजर आणि 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष, गणेश भक्तांचा अमाप उत्साह अशा उत्सवी वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन बुधवारी मोठ्या उत्साहात झाले. एकूण 114 सार्वजनिक, तर 1 लाख 66 हजार 140 घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. जिल्ह्यात दीड, पाच, सात, नऊ ते अकरा दिवसांपर्यंत गणपतीची पूजा करण्याची परंपरा आहे.
बुधवारी सकाळपासूनच ग्रामीण भागामध्ये घरासमोर सडा व रांगोळी रेखाटण्यात आल्यामुळे मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. गणरायाचे आगमन होत असल्यामुळे घराघरांमध्ये बाप्पांच्या स्वागतासाठी सर्वांचाच उत्साह दिसून येत होता. दुपारपर्यंत गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. भाविकांनी गणेशोत्सवासाठी म्हणून खास पारंपरिक पोषाख परिधान केले होते.
ढोल-ताशांच्या गजरात सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशाचे वाजत-गाजत, नाचत स्वागत केले. रिक्षा, कारमधून गणेशमूर्ती घेऊन जाताना नागरिक, कार्यकर्ते यांचा मोठा उत्साह दिसत होता. पावसाने यावेळी दांडी मारल्याने गणरायाचे आगमन निर्विघ्न पार पडले.
जिल्ह्यातील पोलिस ठाणेनिहाय गुहागर : 2 सार्वजनिक तर 14 हजार 460 खासगी, दाभोळ : 1 सार्वजनिक तर 1 हजार 493 खासगी, रत्नागिरी ग्रामीण : 1 सार्वजनिक, 9 हजार 447 खासगी. जयगड : 7 सार्वजनिक, 2 हजार 810 खासगी; देवरूख : 7 सार्वजनिक, 12 हजार 493 खासगी; अलोरे : 3 सार्वजनिक, 5 हजार 650 खासगी; रत्नागिरी शहर : 26 सार्वजनिक, 7 हजार 911 खासगी; राजापूर : 7 सार्वजनिक तर 19 हजार 900 खासगी; चिपळूण 15 सार्वजनिक तर 16 हजार 464 खासगी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच खेडमध्ये 17 सार्वजनिक तर 13 हजार 736 खासगी, मंडणगड 7 सार्वजनिक तर 4 हजार 395 खासगी, बाणकोट 2 सार्वजनिक तर 767 खासगी, सावर्डे 1 सार्वजनिक तर दहा हजार 240 खासगी, पूर्णगड सार्वजनिक गणपती नाही तर 5 हजार 679 खासगी, दापोली 9 सार्वजनिक तर सहा हजार 332, नाटे 2 सार्वजनिक तर 7 हजार 279 खासगी, लांजा 6 सार्वजनिक तर 13 हजार 540 आणि संगमेश्वर 1 तर सार्वजनिक तर 13 हजार 544 खासगी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.