पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा: बांधकाम, रस्ते कामाच्या बिलांच्या फाईल्स तपासून विनात्रूटी पुढे पाठविण्यासाठी कंत्राटदाराकडे ३ हजारांची लाच घेणार्या सहाय्क लेखाधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले. अरुण रघुनाथ मांगलेकर (वय ५५, रा. मनोरमानगर, देवकर पाणंद ) असे संशयिताचे नाव आहे. पन्हाळा पंचायत समितीत ही कारवाई करण्यात आली.
पन्हाळा तालुक्यातील मौजे आरळे गावातील गटर बांधकाम व मौजे सातवे गावतील रस्ता तयार करणार्या कंत्राटदाराने बिलांच्या फाईल्स पन्हाळा पंचायत समितीकडे मंजूरीसाठी पाठविल्या होत्या. लेखा कक्षातील सहायक लेखाधिकारी अरुण मांगलेकर याच्याकडे त्याची तपासणी होणार होती. या फाईल्स विनात्रूटी पुढे पाठविण्यासाठी मांगलेकर यांनी कंत्राटदाराकडे ३ हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
मंगळवारी (दि.४) लाचेच्या मागणीची पडताळणी करुन गुरुवारी (दि. ६) मांगलेकर याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
एसीबीचे उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, सहायक फौजदार संजीव बंबरगेकर, शरद पोरे, सुनील घोसाळकर, रुपेश माने, मयूर देसाई या पथकाने ही कारवाई केली.